भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या १६ हजारांवर – महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पाच हजाराहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली, दि. २७ (वृत्तसंस्था) – देशात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाने दरदिवशी सुमारे ४०० जणांचा बळी जात आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि या साथीने दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातच या साथीने दगावणाऱ्यांची संख्या ७,२७३ वर पोहोचली आहे. शनिवारी राज्यात १६७ जणांचा बळी गेला, तर ५,३१८ नवे रुग्ण आढळले. याशिवाय इतर राज्यांकडून जाहीर माहितीनुसार शनिवारी रात्रीपर्यंत देशात या साथीने दगावलेल्यांची संख्या १६ हजारांवर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात शनिवारच्या सकाळपर्यंत या साथीने १५,६८५ जणांचा बळी गेल्याचे व एकूण रुग्ण संख्या ५,०८,९५३ वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. शुक्रवारपासून शनिवारच्या सकाळपर्यंत तब्बल १८ हजार ५०० हून अधिक रुग्ण आढळले. एका दिवसात नवे रुग्ण सापडण्याचा हा नवा उच्चांक ठरला. तर रात्रीपर्यंत देशातील कोरोनाच्या बळींची संख्या १६ हजारांवर आणि एकूण रुग्ण संख्या सव्वा पाच लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात सलग दुसऱ्यादिवशी पाच हजाराहून अधिक रुग्ण आढळले. चोवीस तासात महाराष्ट्रात ५,३१८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात १५ हजार रुग्ण आढळले आहेत.

देशभरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. देशात सुमारे कोरोनाच्या दोन लाख चाचण्या होत असून आयसीएमआरच्या निर्देशानंतर महाराष्ट्रात १४ ते १५ हजार चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दिल्ली, चेन्नई, मुंबई,ठाणे, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि फरिदाबाद या शहरांसह देशातील १० जिल्ह्यांमध्ये ५४.४७ टक्के रुग्ण आढळत आहेत. तसेच महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्येच कोरोनाचे ८७ टक्के रुग्ण दगावले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या सुमारे एक कोटीवर पोहोचली आहे. वर्ल्डओमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जगात ९९ लाख ९५ हजार ८१८ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तसेच ४ लाख ९८ हजार ८१८ जणांचा या साथीने मृत्यू झाला आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा एका दिवसात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी अमेरिकेत ४५,२५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी गुरुवारी सुमारे ४० हजार नवे रुग्ण अमेरिकेत आढळले होते. अमेरिकेतील लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यावर सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ब्राझीलमधील या साथीच्या रुग्णांची संख्या १३ लाखांवर पोहोचली आहे.

leave a reply