‘पीओके’ मध्ये पाकिस्तान आणि चीन विरोधात जोरदार निदर्शने

नवी दिल्ली – ‘पीओके’मध्ये पाकिस्तान आणि चीनकडून झेलम नदीवर उभारण्यात येत असलेल्या धरणांविरोधात स्थानिकांनी जोरदार निदर्शने केली. या धरणांवरून ‘निदर्शकांनी पाकिस्तान सरकारला जाब विचारला आहे. हे प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यँत आपला विरोध सुरु राहील, असेही निदर्शकांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत पाकिस्तान आणि चीनमध्ये झेलम नदीवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी दीड अब्ज डॉलर्सचा करार झाला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी ‘पीओके’मध्ये ही निदर्शने झाली आहेत.

POK-Protestपाकिस्तान ‘पीओके‘मध्ये चीनच्या मदतीने दोन जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. ११२४ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पाचा २.५ अब्ज डॉलर्सचा एक करार गेल्या महिन्यात पार पडला होता. ७०० मेगावॅटच्या दुसऱ्या जलविद्युत प्रकल्पाचा करार सोमवारी झाला. हा करार सुमारे दीड अब्ज डॉलर्सचा आहे.

मात्र या दोन्ही प्रकल्पांबाबत ‘पीओके’मधील जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. हे दोन्ही प्रकल्प ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’अंतर्गत (सीपीईसी) उभारण्यात येत आहेत. सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा प्रकल्प म्हणजे गुंतवणूक असून त्याचा भार पाकिस्तानी जनतेवर पडणार नाही, अशी ग्वाही पाकिस्तानी जनतेला दिली. चीनच्या विकासापासून आपण बरेच काही शिकलो आहोत आणि ‘ सीपीईसी’ प्रकल्प पाकिस्तानला नव्या उंचीवर घेऊन जाईल, अशी आशा इम्रान खान यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार ‘सीपीईसी’ आणि त्याअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांबाबत पाकिस्तानी जनतेला आश्वासन द्यावे लागत आहे. कारण या प्रकल्पावर पाकिस्तानात आता जोरदार टीका होऊ लागली आहे. चीनने ‘सीपीईसी’साठी गुंतवणुकीच्या नावाखाली दिलेल्या प्रचंड कर्जामुळे पाकिस्तान चीनची वसाहत बनल्याचे आरोप होत आहेत. तसेच चीनकडून देण्यात आलेल्या या कर्जाचे व्याज चुकते करण्यासाठी पाकिस्तानला नवे कर्ज घ्यावे लागत आहे. या प्रकल्पामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या आणि रोजगारांची निर्मिती होईल, असे गाजर पाकिस्तानी जनतेला दाखविण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानच्या जनतेची घोर निराशा झाली आहे. उलट पाकिस्तान यामुळे अधिक कर्जाच्या गाळात रुतला असल्याचे पाकिस्तानचे विश्लेषकच सांगत आहेत.

POK-Protest‘सीपीईसी’ प्रकल्प ‘पीओके’, गिलगिट-बाल्टिस्तान आणि बलोचिस्तानातून जात असून तेथे या प्रकल्पाविरोधात जोरदार असंतोष आहे. बलोचिस्तानात चिनी कामगारांवर हल्लेही झाले आहेत. पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानात या प्रकल्पाविरोधात सातत्याने निदर्शने होत आहेत. पाकिस्तान केवळ येथील साधनसंपत्ती लुटत असून येथील जनतेवर अन्याय करीत असल्याचे आरोप येथील जनतेकडून केले जातात.

मंगळवारी ‘पीओके’मधील निदर्शकांनी पाकिस्तान आणि चीन कोणत्या अधिकाराखाली झेलमवर जलविद्युत प्रकल्प उभारत आहेत, असा थेट जाब पाकिस्तानला विचारला. तसेच हा प्रकल्प आणि येथील नद्या अशारीतीने काबीज करण्याचा प्रयत्न हा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षापरिषदेच्या ठरावाचे उल्लंघन ठरते, असे बजावले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यातही भारताने पाकिस्तानला ‘पीओके’ खाली करा असे बजावले होते. भारत ‘पीओके’चा ताबा घेईल, अशी धास्ती पाकिस्तान आणि चीनला सतावत असून त्यामध्ये पीओकेमधील जनतेमध्ये वाढत असलेला असंतोष आणि येथे वारंवार होणारी निदर्शने पाकिस्तानसह चीनच्या चिंतेत भर घालत आहेत.

leave a reply