मुंबई – गुरुवारी मुंबईच्या फोर्ट भागातील सहा मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बळींची संख्या १० वर पोहोचली आहे. शुक्रवारी ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. बचावकार्य अजून सुरु असल्याचे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक’च्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्याने सांगितले आहे. गुरुवारीच मालाडच्या मालवणीमध्ये दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला होता.
मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी सायंकाळी फोर्ट परिसरातील ८० वर्षे जुन्या भानूशाली इमारतीचा भाग कोसळला होता. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० हून अधिक जण दबल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातील २३ जणांना वाचविण्यात यश आले, तर १० जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत.
या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु होते. पण कोरोनाव्हायरसमुळे हे काम थांबले होते, असे म्हाडाने म्हटले आहे. तसेच पालिकेने ही इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर बऱ्याचजणांनी घरे रिकामी केली होती. दरम्यान, गेल्या सात वर्षात मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये सुमारे ३०० जणांचा बळी गेला आहे.