नवी दिल्ली – चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी टाकली आणि भारतीयांनी २०० नवे अॅप्स तयार केले. देशाकडील या प्रतिभेचे कौतुक करताना चीनला मागे टाकून मोबाईल उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी जाहीर केले. गेल्या सहा वर्षात भारताने या क्षेत्रात पाचव्या क्रमाकांवरून दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे, असे प्रसाद म्हणाले.
‘डेटा प्रायव्हसी, डेटा सिक्युरिटी’ या विषयावर पार पडलेल्या एका वेबिनारमध्ये केंद्रीय मंत्री प्रसाद बोलत होते. लडाखमध्ये चीनने केलेल्या विश्वासघातानंतर भारताने ५९ चिनी अॅप्सवर सुरक्षेच्या कारणामुळे बंदी टाकली. या अॅप्समधील भारतीय डेटा सुरक्षित नसल्याचे आरोप करण्यात येत होते. त्याचा संदर्भ देऊन केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी ‘डेटा ही देशाची संपत्ती आहे. भारतीयांचा डेटा हा समाज आणि देशाचा आहे. त्यामुळे याबतीत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही’, असा विश्वास दिला. आरोग्य, कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील डेटा सुरक्षित असणे गरजेचे आहे’, असेही प्रसाद पुढे म्हणाले.
केंद्र सरकार डेटा सुरक्षेसाठी कायदा आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात हा कायदा मंजूर झाला होता. आता संसदीय समिती यावर अभ्यास करीत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितले. देशाची सुरक्षा आणि नागरिकांच्या डेटाला प्राधान्य देऊन सरकारने ५९ चिनी अॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अॅप्स तयार करण्याचे आवाहन केले होते. याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत २०० नवे अॅप्स विकसित झाले आहेत, असे प्रसाद यांनी यावेळी घोषित केले.
२०१४ साली देशात केवळ दोनच ‘इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर’ होते. आज त्याची संख्या २६०वर गेल्याचे रविशंकर प्रसाद म्हणाले. देश मोबाईल उत्पादनात पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पण पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनला मागे टाकून हे स्थान पटकाविणे, हे प्रमुख लक्ष्य असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. त्या दिशेनेच भारत प्रयत्न करीत असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी स्पष्ट केले.
सध्या जगभरात मोबाईल उत्पादन क्षेत्रात चीनचा दबदबा आहे. भारत मोबाईल उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असला, तरी चीनमध्ये जगातील बहुतांश कंपन्यांचे उत्पादन कारखाने आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीची तयारी केली आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी भारतात मोठी गुंतवणुकीची घोषणा केल्यावर चीनला याची धग जाणवू लागल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाईल उत्पादन क्षेत्रात चीनला मागे टाकण्याचा केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी जाहीर केलेले लक्ष्य महत्त्वाचे ठरते.