हैदराबादमधील ‘भारत बायोटेक’ने ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) मदतीने कोरोनावरील लस ‘कोवॅक्सिन’ विकसित केली आहे. या स्वदेशी लसीचे प्राण्यांवरील परीक्षण यशस्वी झाल्यानंतर मानवी चाचणीसाठी ‘सीडीएससीओ’कडून परवागनी मिळाली होती. यानुसार विविध राज्यांमधल्या १२ हॉस्पिटल्समध्ये या लसीची चाचणी केली जाणार आहे. यात ‘एम्स दिल्ली’, ‘एम्स पाटणा’ अशा संस्थांचा समावेश आहे. या परिक्षणात निरोगी असलेल्या लोकांना सामिल करून घेतलं जाणार असून १८ ते ५५ वयोगटातल्या स्वयंसेवकांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत.
भारत बायोटेकला केंद्र सरकारकडून कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी तीन टप्प्यांत मानवी चाचणीसाठी परनवानगी मिळाली आहे. देशातील एकूण सात कंपन्या लस निर्मितीच्या कामात गुंतल्या आहेत. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण केले जाणार आहे, त्यानंतर १४ दिवसाच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे. या काळात लसीचा काही दुष्परिणाम होत आहे का हे तपासले जाईल.
ही चाचणी यशस्वी ठरली तर कोवॅक्सिनचे २० कोटी डोस तयार करण्याची आमची तयारी आहे, असे भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इला यांनी म्हटले आहे. दरम्यान, हरियाणाच्या रोहतकमध्ये तीनजणांना ही लस देण्यात आली. त्या लसीचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. यापुढेही लस दिल्यानंतर काय परिणाम दिसून येतात याचे निरीक्षण केले जाणार आहे. या मानवी चाचणीचे अहवाल ‘आयसीएमआर’ला पाठविले जाणार आहेत.