गुवाहाटी/पटणा/ पिठोरागढ – गेल्या काही दिवसांपासून आसाम, बिहारमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. आसाममध्ये आलेल्या पुरात रविवारी सहा नागरिकांचा बळी गेला असून मृतांचा आकडा ८५ वर पोहोचला आहे. या पुरामुळे आसाममधील ७० लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे रविवारी वीज कोसळून १० नागरिकांचा मृत्यू झाला. तर उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तीन नागरिकांचा बळी गेला असून सहा नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.
मुसळधार पावसामुळे आसाममधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आसामच्या ३३ जिल्ह्यांपैकी २८ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’कडून नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र पुरामुळे रस्ते, पुलाचे नुकसान झाल्याने मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत. २८ जिल्ह्यातील ३३७१ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून ४४ हजार नागरिकांना रिलीफ कँपमध्ये हलवण्यात आले आहे.
आसाम सरकारतर्फे १४ जिल्ह्यांत २०० पेक्षा जास्त रिलीफ कँप उभारले आहेत. पुरामुळे १.२८ लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यातच ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बराक दांडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यालाही या पुराचा फटका बसला असून जवळपास ९५ टक्के म्हणजेच ४३० चौरस किलोमीटरचा भाग पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे आतापर्यंत १०८ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
आसामसह बिहारलादेखील पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. रविवारी बिहारच्या सात जिल्ह्यात वीज कोसळून १० जण ठार झाले. पूर्णियामध्ये तीन, बेगूसरायमधील दोन, पटना, सहरसा, पूर्व चंपारण, मधेपुरा आणि दरभंगा जिल्ह्यात प्रत्येकी एका नागरिकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. बिहारमध्ये गेल्या तीन आठवड्यात वीज कोसळून १६० नागरिकांचा मृत्यू झाला. रविवारी उत्तराखंडच्या माडकोट गावात ढगफुटी झाल्याने तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून सहा नागरिक बेपत्ता आहेत. पांतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम व बिहारच्या मुखमंत्र्यांबरोबर चर्चा करून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.