‘आयएसआय’ गँगस्टर्सच्या मदतीने भारतात हल्ले घडविण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांच्या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’मध्ये कमालीची बेचैनी वाढली आहे. म्हणूनच ‘आयएसआय’ आणि ‘आयएसआय’शी संलग्न दहशतवादी संघटना भारतात हल्ले घडविण्यासाठी, येथील सुरक्षा व्यवस्था बिघडविण्यासाठी भारतातील गँगस्टर्सनाच तयार करीत आहे. चंदीगडच्या गुप्तचर यंत्रणेला ही खबर लागली असून त्यांनी देशातील सर्व गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

'आयएसआय'

गेल्या काही वर्षांपर्यंत भारतातील स्लिपर सेल्स ‘आयएसआय’चा आधार होती. या स्लिपर सेल्सच्या सहाय्याने ‘आयएसआय’ने भारतात हल्ले घडविले होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या सुरक्षादलांनी या स्लिपर सेल्सचे पुरते कंबरडेच मोडून काढले आहे. सुरक्षादलांच्या कारवाईच्या भितीमुळे हे स्लिपर सेल्स आता ‘आयएसआय’साठी काम करीत नाहीत. त्यामुळे ‘आयएसआय’ आता हल्ल्यांसाठी लोकल गँगस्टर्सना तयार करीत आहे.

‘आयएसआय’ आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना या गँगस्टर्सच्या संपर्कात आहे. त्यांना भारतात हल्ले घडविण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. तर काहींवर जबाबदारी सोपविली गेली आहे. यातील काही गँगस्टर्स फरार आहेत. तर काही तुरुंगात कैद असल्याचे चंदीगडच्या गुप्तचर यंत्रणेने म्हटले. चंदीगडच्या गुप्तचर यंत्रणेने देशातल्या सर्व यंत्रणांकडे या लोकल गँगस्टर्सच्या नावाची यादी सोपविली आहे. यानंतर देशातल्या गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या आहेत.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करीत असल्याचे नव्याने समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी सेंट्रल इंटेलिजन्सच्या पंजाब युनिटने एक अर्लट जारी केला होता. ‘आयएसआय’ आणि पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने पाच गँगस्टर्सना काही नेत्यांना लक्ष्य करण्याचे आदेश दिले होते. या पाच गँगस्टर्समध्ये दोन फरार आहेत. तर तिघेजण पंजाबच्या तुरुंगात कैद आहेत. हे गँगस्टर्स तुरुंगातून रॅकेट्स चालवित आहेत. त्यांच्यावर पोलिसांना लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकांर्‍याने म्हटले. तर गेल्या आठवड्यात बंगळुरू येथून ताब्यात घेतलेला ‘आयएस’चा दहशतवादी हा देखील पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या संपर्कात होता. ‘आयएसआय’ मार्फतच या दहशतवाद्याची ‘आयएस’मध्ये भरती झाल्याची माहिती समोर आली होती.

leave a reply