बीजिंग – अमेरिकेने हॉंगकॉंगवर लादलेले आर्थिक निर्बंध केवळ चीन आणि अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाच्या विरोधात आहेत, असा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉंगकॉंगला दिलेला स्पेशल स्टेटस रद्द केला असून, हॉंगकॉंगसह चीनमधील ११ नेत्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या या कारवाईमुळे हॉंगकॉंगमध्ये कार्यरत असणाऱ्या वित्तसंस्था तसेच चिनी बँकांना मोठा फटका बसेल असे मानले जाते. त्यामुळेच चीनकडून तीव्र प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच, अमेरिकेने हॉंगकॉंगच्या प्रशासकीय प्रमुख कॅरी लॅम यांच्यासह ११ जणांवर निर्बंध लादल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हॉंगकॉंगमधून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना यापुढे ‘मेड इन चायना’ हे लेबल बंधनकारक असेल, असा निर्णयही ट्रम्प प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हॉंगकॉंगबरोबरील तीन द्विपक्षीय करार रद्द करीत असल्याची घोषणा केली होती. चिनी राजवटीच्या नियंत्रणाखाली आलेले हॉंगकॉंग कधीच यशस्वी ठरणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.
अमेरिकेच्या या कारवायांमुळे जागतिक वित्त केंद्र म्हणून ओळख मिळवलेल्या हॉंगकॉंगला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या कंपन्या व वित्तसंस्थांनी हॉंगकॉंगमधील आपला व्यवसाय हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बिथरलेल्या चीनने अमेरिकेच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘अमेरिकेचे निर्णय हॉंगकॉंगच्या आर्थिक स्थैर्याला धक्का देणारे आहेत. त्यांच्या कारवाया चीन व अमेरिकेसह संपूर्ण जगातीळ जनतेच्या विरोधात आहेत. एकतर्फी कारवाई करून अमेरिकी सरकारने स्वतःच्याच पायात गोळी मारण्याचा उद्योग करू नये’, अशी टीका चीनच्या ‘बँकिंग अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी कमिशन’ने केली.
अमेरिकेकडून वित्तसंस्थांच्या व्यवहारात हस्तक्षेप सुरूअसून बाजारपेठेवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेशी निगडित तत्त्वांचे सर्रास उल्लंघन चालू असल्याचा आरोपही चीनने केला. आर्थिक वर्चस्ववादाच्या बळावर सुरू असलेले अमेरिकेचे हे उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही चीनने दिला. अमेरिकेच्या निर्णयांमुळे चीन व हॉंगकॉंगसह अमेरिकेतील सक्रिय असणाऱ्या मोठ्या वित्तसंस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीनने आपल्या बँकांना अमेरिकेच्या कचाट्यात सापडणार नाही असे पर्याय शोधण्याचा सल्ला दिल्याचेही समोर आले आहे.