देशांतर्गत विमानांच्या फेऱ्यांमध्ये ६० टक्यांपर्यंत वाढीस मंजुरी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने हवाई कंपन्यांना देशांतर्गत प्रवासासाठी विमानांच्या फेऱ्यांमध्ये ६० टक्यांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी जूनच्या अखेरीस नागरी उड्डाण मंत्रालयाने ४५ टक्के फेऱ्या सुरू करण्यास मंजुरी दिली होती. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे मार्च महिन्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या विमान कंपन्यांना सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

६० टक्यांपर्यंत वाढ

कोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विमानसेवाही बंद करण्यात आली होती. ही सेवा २५ मेपासून चालू होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने हवाईसेवेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांची तपासणी, बॅगांवर औषध फवारणी करुन त्या निर्जंतुक करणे, थर्मल स्क्रीनिंग करुन प्रत्येक प्रवाशाचे ‘टेंपरेचर गन’द्वारे तापमान तपासण्यासह आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे.

२५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याने विमान कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र सेवा हळूहळू सुरु होत असल्याने कंपन्या व नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. काही दिवसापूर्वीच कंपन्यांना प्री-पॅकेज्ड स्नॅक्स, खाद्य व पेयपदार्थ वितरित करण्याची परवानगी देण्यात आली होती.

प्रवाशांनाही या निर्णयाचा फायदा होईल. प्रवाशांना विमानाचे अधिक पर्याय मिळतील, तसेस भाडे काही प्रमाणात कमी होईल. उत्सवाच्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे विमान कंपन्यांची कमाईही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विमानाच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम शेअरबाजारातही उमटले. इंटरग्लोब एव्हिएशन आणि स्पाइस जेट यासारख्या कंपन्यांच्या समभागात वाढ नोंदविण्यात आली आहे.

leave a reply