नवी दिल्ली – ‘युनायटेड लिब्रेरशन फ्रंट ऑफ आसाम – इंडिपेंडन्ट’ (उल्फा- आय) या बंडखोरी संघटनेने आपला तळ म्यानमारमधून चीनला हलविला आहे. येथूनच उल्फाचा हा गट भारतविरोधी कारवाया करीत आहे. ‘उल्फा-आय’चा प्रमुख परेश बरुआ हा चीनच्या युनान प्रांतातल्या रुईलूमधून भारतविरोधी कारवाया करीत असल्याचे याआधी वारंवार दावे झाले होते. आता उल्फाने चीनमध्ये आपला तळ स्थापन केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेंशन) ट्रिब्युएनलकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली.
म्यानमारच्या लष्कराच्या आपल्या सीमेत असलेल्या भारतातील बंडखोरी संघटनांच्या तळावर केलेल्या जोरदार कारवाईमुळे ‘उल्फा’ला जबर दणका बसला आहे. २०१९ सालापासून म्यानमारच्या लष्कराने म्यानमार सीमाभागातल्या बंडखोर संघटनांच्या तळांवर जोरदार हल्ले चढविण्यास सुरुवात केली. यात उल्फाच्या तळाचे जबर नुकसान झाले. म्यानमारच्या लष्कराने इथल्या उल्फाच्या प्रमुख तळांवर ताबा मिळविला होता. या कारवाईत उल्फाचे काही दहशतवादी ठार झाले होते. तर काही जणांना म्यानमारने भारताच्या स्वाधीन केले होते. यानंतर अस्वस्थ झालेल्या उल्फाने चीनमध्ये आपला तळ हलविला, असे तपासात समोर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले स्वतंत्र प्रतिज्ञापत्र ट्रिब्युएनलकडे सादर केले आहे. यामुळे ही माहिती जाहीर झाली आहे. ‘उल्फा-आय’चा प्रमुख परेश बरुआ हा चीनमध्येच गेली कित्येक वर्ष लपला आहे आणि तेथून ध्वनीफित प्रसिद्ध करून तो भारताविरोधात गरळ ओकत असतो. तसेच ईशान्य भारतात कार्यरत उल्फा-आयच्या बंडखोरांच्या संपर्कात असतो. मात्र आता उल्फाने आपला तळही चीनमध्ये स्थापन केल्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.