दुबई/जेरूसलेम – ‘रेड सी’मार्गे भूमध्य समुद्राला जोडणार्या ‘एलियट-अश्केलॉन’ या गोपनिय इंधन पाईपलाईनच्या वापरासंबंधी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात ऐतिहासिक करार पार पडला. या करारानुसार युरोपिय देशांना होणारा युएईच्या इंधनाचा पुरवठा सदर पाईपलाईनमधून होणार आहे. गेल्या महिन्यात इस्रायल आणि युएई’मध्ये सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा करार मानला जातो. इराणने इस्लामिक क्रांतीच्या आधी इस्रायलबरोबर ‘एलियट-अश्केलॉन’ पाईपलाईनची निर्मिती केली होती. त्यामुळे सदर पाईपलाईन संबंधीच्या या करारावर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
सप्टेंबर महिन्यात इस्रायल आणि युएईने गेल्या कित्येक वर्षांचे मतभेद बाजूला ठेवून ‘अब्राहम अकॉर्ड’अंतर्गत सहकार्य प्रस्थापित केले. सदर सहकार्य पुढे नेण्यासाठी चार दिवसांपूर्वी अबू धाबीमध्ये अमेरिकेचे कोषागारमंत्री स्टिव्ह म्नुन्किन यांच्या उपस्थितीत इस्रायल आणि युएईचे नेते तसेच अधिकार्यांमध्ये वेगवेगळे करार पार पडले. यामध्ये इस्रायलच्या ‘युरोप एशिया पाईपलाईन कंपनी’ आणि युएईच्या ‘मेड-रेड लँड ब्रिज लिमिटेड’ या दोन कंपन्यांमधील प्राथमिक कराराचा समावेश होता. या करारानुसार, युएईकडून युरोपिय देशांना पुरविल्या जाणार्या इंधनाचा पुरवठा यापुढे रेड सी आणि भूमध्य समुद्राला जोडणार्या ‘एलियट-अश्केलॉन’ पाईपलाईनमधून करण्याचे निश्चित झाले.
इस्रायल आणि युएईच्या कंपन्यांमधील हा ८० कोटी डॉलर्सचा हा करार असून यामुळे सुएझच्या कालव्यातून होणारा इंधनाची वाहतूक बर्याच प्रमाणात कमी होईल, असा दावा केला जातो. आखाती देशांमधून युरोपला पुरविणार्या इंधनाची बरीचशी वाहतूक सुएझच्या कालव्यातून तसेच इजिप्तच्या इंधनवाहू पाईपलाईनमधून केली जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भूमध्य समुद्रात युरोपिय देश आणि तुर्कीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सुएझच्या कालव्यातून होणार्या इंधनाच्या वाहतुकीच्या सुरक्षेवरही विचार होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत सुएझच्या कालव्याला पर्याय ठरू शकणार्या व रेड सी आणि भूमध्य समुद्राला जोडणार्या इस्रायलच्या ‘एलियट-अश्केलॉन’ पाईपलाईनसंबंधी इस्रायल आणि युएईतील या कराराकडे पाहिले जाते. येत्या काळात आखातातील इतर अरब देश देखील या पाईपलाईनचा वापर करण्याची शक्यता असल्याचे दावे केले जातात.
१९६० च्या दशकात इस्रायल आणि इराणच्या तत्कालिन हुकूमशहाने ‘एलियट-अश्केलॉन’ या पाईपलाईनची निर्मिती केली होती. या पाईपलाईनमधून प्रति दिन सहा लाख बॅरेल्स इंधनाची वाहतूक होऊ शकते. आधीच्या काळात सव्वा कोटी बॅरेल्सच्या इंधनाच्या साठवणूकीची सोय देखील इस्रायलच्या या शहरांमध्ये करण्यात आली होती. १९७९ सालच्या इराणमधील इस्लामिक क्रांतीपर्यंत ‘एलियट-अश्केलॉन’ या पाईपलाईनचा वापर युरोपिय देशांना इंधन पुरविण्यासाठी सुरू होता. पण कट्टरपंथी गटांनी इराणमध्ये राजवट प्रस्थापित केल्यानंतर ‘एलियट-अश्केलॉन’ पाईपलाईनसंबंधीचा व्यवहार ठप्प झाला होता. काही वर्षांपूर्वी इराणने इस्रायल गोपनियरित्या या इंधन पाईपलाईनचा वापर करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच इस्रायलकडून एक अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसानभरपाईची मागणी केली होती. अशा परिस्थितीत, युरोपमधील इराणच्या इंधन व्यवहारांना हादरा देणार्या इस्रायल आणि युएईमधील या इंधनविषयक करारावर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.