नवी दिल्ली – देशातील उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या ७ लाखांच्या खाली गेली आहे. शनिवारी देशात ५३,३७० नव्या रूग्णांची नोंद झाली, तसेच ६५० रुग्ण दगावले. त्याचवेळी सुमारे ७४ हजार रूग्ण बरे झाले. आतापर्यंत देशातील या साथीच्या बरे झालेल्या रूग्णांची संख्या ७० लाख ६८ हजारांवर पोहोचली आहे. देशातील कोरोनाची ही स्थिती सुधारत असली तरी पुढील तीन महिने निर्णायक असतील असा सावधतेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिला आहे.
शनिवारी महाराष्ट्रात ६,४१७ नव्या रूग्णांची नोंद झाली तर दहा हजार रूग्ण बरे झाले. कर्नाटकात ४,४७१ नव्या रूग्णांची नोंद झाली तर ७ हजार १५३ रूग्ण बरे झाले आहेत. इतर राज्यातही आढळणाऱ्या इतर रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. भारतातील कोरोनाच्या बरे होणाऱ्या रूग्णांचा दर ८९.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची स्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, ‘जनतेने सावधानता बाळगली नाही आणि नियमांचे पालन केले नाही’, तर कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते असे इशारे देण्यात येत आहेत.
पुढील तीन महिने सणासुदीचा काळ आहे. या काळात नागरिकांनी सर्व नियमांचे आणि सुरक्षा उपायांचे पालन करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने होऊ शकतो असे इशारे याआधी देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पुढील तीन महिने देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत निर्णायक ठरतील असे म्हटले आहे.