फिलाडेल्फिआ – चीन हाच अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी असलेला सर्वात मोठा धोका असल्याचा इशारा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी दिला. यावेळी हॅले यांनी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचीही प्रशंसा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व प्रशासनाने गेल्या वर्षभरात चीनविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले असून, कोरोनासह इतर क्षेत्रातील चीनच्या कारवायांना लक्ष्य केले आहे. चीन अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकांवरही प्रभाव टाकीत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला असून, हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनविला आहे. निक्की हॅले यांनी दिलेला इशाराही त्याचाच भाग ठरतो.
संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले या चीनच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी, अमेरिकन काँग्रेसने जगभरात चीनचा वाढत असलेला पुढाकार रोखण्यासाठी वेळीच पावले उचलावी, यासाठी ‘स्टॉप कम्युनिस्ट चायना’ ही मोहीमही सुरू केली होती. या मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर, निक्की हॅले यांनी चीनविरोधातील टीकेची धार अधिकच तीव्र केल्याचे दिसत आहे.
‘सध्या अमेरिकेला असलेल्या धोक्यांच्या यादीत चीन हाच पहिल्या क्रमांकाचा धोका आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही चीन सर्वात मोठा धोका ठरतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, व्यापारी कराराच्या माध्यमातून बौद्धिक संपदा हक्कांच्या मुद्यावर चीनला धारेवर धरण्याचे धाडस दाखविले. यापुढील काळात चीन पुन्हा पलटी खाऊन अमेरिकेच्या बौद्धिक संपदेची चोरी करण्याची चूक करणार नाही. ट्रम्प यांनी चीनला या गोष्टीची स्पष्ट जाणीव करून दिली आहे. चीन अमेरिकी शिक्षणसंस्थांमध्ये घुसखोरी करून हेरगिरी करू शकणार नाही. चीनबरोबरील संबंध पुढे नेण्यापूर्वी त्यांच्या प्रत्येक कारवायांसाठी जबाबदारी निश्चित केली जाईल’, या शब्दात निक्की हॅले यांनी चीनवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचा मुद्दाही उपस्थित केला.
‘यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे लष्करी सहाय्य पुरविले होते. या सहाय्याचा वापर पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसण्यासाठी करीत होता. पाकिस्तानने आश्रय दिलेले हे दहशतवादी अमेरिकी जवानांचे बळी घेत होते. मात्र आता अमेरिका पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स देत नसून, ट्रम्प यांनी पाकिस्तानला देण्यात येणारे हे सहाय्य बंद केले. केवळ संयुक्त राष्ट्रसंघावर अवलंबून न राहता, राष्ट्राध्यक्षांनी अधिक प्रभावीपणे हा मुद्दा हाताळला’, या शब्दात निक्की हॅले ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांकडे लक्ष वेधले. दोन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय समुदायाने ‘टेरर फंडिंग’च्या मुद्यावर पाकिस्तानवर असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर हॅले यांनी त्याचा उल्लेख करून पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कारवायांची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.
पुढील आठवड्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असून, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे. ट्रम्प यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ मंत्री तसेच समर्थक नेते चीनला लक्ष्य करीत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही नुकतीच, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा अमेरिकेला असलेला धोका हे वास्तव असल्याची टीका केली होती.