तेल अवीव – सिरियन जवानांच्या गणवेशात गोलान टेकड्यांवर हल्ले चढवून इस्रायलविरोधात युद्ध पुकारण्याचा डाव इराण व हिजबुल्लाहने आखला आहे. गोलान टेकड्यांच्या या युद्धासाठी इराण व हिजबुल्लाह सिरियन स्थानिकांचाही वापर करीत आहे. त्याचबरोबर इराण व हिजबुल्लाहने सिरियन लष्करामध्ये ‘डुप्लिकेट कमांड’ उभारल्याची माहिती इस्रायली वर्तमानपत्राने दिली. इराण व हिजबुल्लाहच्या या कटाची माहिती असलेल्या इस्रायलने सिरियन सीमाभागातील नागरिकांना सावध करण्यास सुरुवात केली असून इराणपासून दूर राहण्याची सूचना केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून इराण, हिजबुल्लाह तसेच सिरियन राजवटीकडून गोलान टेकड्यांबाबत इस्रायलला धमक्या दिल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने गोलान टेकड्यांवरील इस्रायलचे नियंत्रण मान्य नसल्याचे सांगून या टेकड्यांचा ताबा घेण्यासाठी इस्रायलविरोधात युद्ध छेडण्याची घोषणा केली होती. तर सिरियातील गोलान सीमेजवळ इराणचे जवान व हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांच्या हालचाली वाढत असल्याचा इशारा इस्रायली लष्कराने दिला होता. इराण व हिजबुल्लाहच्या या हालचाली म्हणजे इस्रायलविरोधात दुसरी आघाडी उघडण्याची तयारी असल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे.
हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी याआधीच लेबेनॉनच्या दक्षिणेकडे हजारो रॉकेट्स, क्षेपणास्त्रांची जमवाजमव केली आहे. इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करुन मोठी आघाडी उघडण्याची धमकी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाने दिली होती. पण आता इराण व हिजबुल्लाहने सिरियाच्या गोलान भागातून इस्रायलविरोधात दुसरी आघाडी उघडण्याची योजना आखली असून सिरियन लष्कराच्या आडून इस्रायलवर हल्ल्याची तयारी केली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये इराण व हिजबुल्लाहने सिरियन गोलान भागात घुसखोरी केली असून इराणचे जवान, इराणसंलग्न दहशतवादी सिरियन जवानांच्या वेषात येथे गस्त घालत असल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला.
इस्रायलच्या गोलान टेकड्यांवर हल्ला चढविण्यासाठी इराणने सिरियन लष्कराप्रमाणे स्वतंत्र कमांड सेंटर देखील उभारले आहे. सिरियन लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी काही दिवसांपूर्वी या कमांड सेंटरला भेट दिली होती. सिरियन जवानांच्या वेषातील इराणसंलग्न दहशतवाद्यांच्या गोलान सीमेवरील हालचाली इस्रायलने टिपल्याचा दावा या वर्तमानपत्राने केला. याव्यतिरिक्त इराण सिरियाच्या गोलानमधील स्थानिकांना ३० डॉलर्स प्रति महिना देऊन इस्रायलवर हल्ल्यासाठी चिथावणी देत असल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने म्हटले आहे. इराण व हिजबुल्लाहच्या या हालचालींमुळे इस्रायलने गोलान टेकड्यांवर सिरियन जनतेसाठी उभारलेले वैद्यकीय शिबिर बंद केले असून येथील लष्करी गस्त वाढविली आहे.
त्याचबरोबर इस्रायली लष्कराने सिरियातील गोलान भागात घुसून इराणसंलग्न दहशतवाद्यांवर कारवाई केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. तर इस्रायली लष्कराने सिरियाच्या गोलानमध्ये विमानाच्या सहाय्याने पत्रके टाकून हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना सहाय्य करणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सिरियाच्या दक्षिणेकडील गोलान भागातील इराणच्या या वाढत्या हालचाली रोखण्यासाठी इस्रायलला रशियाचे समर्थन मिळत असल्याचा दावाही सदर इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे.