‘शिंकू ला’ बोगद्यासाठी वायुसेनेच्या ‘चिनूक’द्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण

‘शिंकू ला’श्रीनगर – गेल्या महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला झालेला रोहतांग टनेल हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा केला जातो. या बोगद्यामुळे लडाखमधील भारतीय लष्कराची वाहतूक अधिक सोपी झाली आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशाच्या मनाली आणि लडाखच्या कारगिलला जोडणारा ‘शिंकू ला’ बोगद्याचे काम सुरू झाले आहे. डोंगराळ भागातून जाणार्‍या ‘शिंकू ला’च्या बोगद्यासाठी वायुसेनेची मदत घेण्यात आली असून चिनूक हेलिकाप्टरद्वारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सुमारे साडे तेरा किलोमीटर लांबीचा हा ‘शिंकू ला’ बोगदा सामरिकदृष्ट्या फारच महत्त्वाचा ठरणार आहे.

मनाली-लेह महामार्गाने कारगिलपर्यंत पोहोचण्यासाठी चारशेहून अधिक किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. सध्या या प्रवासासाठी एक दिवस खर्ची पडत आहे. तर हिवाळ्याच्या मोसमात हा महामार्ग बंद केला जातो. यामुळे लष्कराची मोठी गैरसोय होत असून हवाई वाहतुकीवर अवलंबून रहावे लागते. लष्कर व स्थानिकांची ही अडचण लक्षात घेऊन मनाली आणि लेहमार्गे कारगिलला जोडणार्‍या ‘शिंकू ला’ बोगद्याच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले असून सोमवारपासून या मार्गाचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले आहे. डोंगराळ भागातील या सर्वेक्षणासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण अर्थात विद्युत चुंबकीय सर्वेक्षणाची मदत घेतली जात आहे.

‘शिंकू ला’

सोमवारी वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरने ५०० किलो वजनाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँटिना उचलून सर्वेक्षण सुरू केले आहे. या अँटिनाच्या सहाय्याने डोंगराळ भागातील पृष्ठभाग रचनांचे स्पष्ट, त्रिमितीय चित्र मिळविण्यासाठी विद्युत चुंबकीय सर्वेक्षण केले जाते. तज्ञांच्या पथकाने अल्ट्युटर, वार्‍याचा वेग यासह अनेक तांत्रिक बाबींचा बारकाईने परीक्षण सुरू केले असून बोगद्याची निर्मिती करताना याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिन्यात दोन वेळा या सर्वेक्षणाची चाचणी घेण्यात आली व त्यानंतरच सोमवारी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. भारत व डेन्मार्कच्या चार इंजिनिअर्सनी मिळून अवघ्या दोन दिवसात या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षणासाठी आवश्यक अँटिनाची जोडणी केली.

हिमाचल प्रदेशच्या लाहौल येथील दारचा भागातून या बोगद्याचे काम सुरू झाले असून लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील फोतोस्कार या भागात हे काम पूर्ण होईल. या बोगद्यामुळे मनाली आणि कारगिलमधील अंतर अडीचशे किलोमीटरने कमी होईल आणि अवघ्या काही तासात हे अंतर कापले जाईल, असा दावा केला जातो. अटल बोगद्यापेक्षाही हा बोगदा मोठा असेल व या बोगद्याच्या निर्मितीमुळे चीनच्या सीमेवर सैन्य व लष्करी साहित्यांची वाहतूक अधिक सुलभ होईल. मुख्य म्हणजे कुठल्याही मोसमात या बोगद्याचा वापर करुन लष्कराची वाहतूक विना अडथळा सुरू राहील, असा दावा केला जातो. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनबरोबर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘शिंकू ला’ बोगद्याचे काम आणि त्यासाठी चिनूक हेलिकाप्टरद्वारे सुरू असलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.

leave a reply