इस्लामाबाद – शेकडो वैमानिकांच्या बनावट लायसन्सचे प्रकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांवर अपयशी ठरलेली ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स’वर (पीआयए) जगभरातील तब्बल १८८ देशांकडून बंदी टाकली जाऊ शकते. पाकिस्तानच्या विमानसेवेसाठी हे सर्वात मोठे संकट ठरेल, अशी भीती पाकिस्तानच्या वैमानिक संघटनेने व्यक्त केली. पाकिस्तानातील ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून युरोपिय महासंघाने ‘पीआयए’ची विमानसेवा बंद केल्यामुळे २५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.
जुलै महिन्यात पाकिस्तानच्या संसदेत उड्डयनमंत्री गुलाम सरवर खान यांनी ‘पीआयए’तील ३० टक्के वैमानिकांकडे बनावट लायसन्स असल्याची माहिती जाहीर केली होती. या वैमानिकांनी परिक्षा न देता लायसन्स मिळविल्याचा धक्कादायक आरोप गुलाम यांनी केला होता. पाकिस्तानी मंत्र्यांनीच दिलेल्या या माहितीनंतर अमेरिका, ब्रिटनसह युरोपिय महासंघ, अरब देशांनी तसेच आग्नेय आशियाई देशांनी ‘पीआयए’ची सेवा बंद केली होती. त्याचबरोबर ‘पीआयए’च्या विमानांना आपल्या हवाईहद्दीत प्रवेश नाकारला. इतकेच नाही तर अरब व आग्नेय आशियाई देशांमधील विमानसेवा कंपन्यांनी पाकिस्तानी वैमानिकांना सेवेतून बाहेर काढले होते.
नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा संघटनेच्या बैठकीतही ‘पीआयए’च्या वैमानिकांच्या लायसन्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचबरोबर विमानसेवा कंपन्यांसाठी आंतरराष्ट्रीय मानांकने अधिक कठोर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर पाकिस्तानच्या विमान उड्डयन प्राधिकरणाला पाठविलेल्या पत्रात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मानांकनावर सपशेल अपयशी ठरल्याची खरडपट्टी काढण्यात आली. पाकिस्तानच्या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानसेवा संघटनेच्या या खरडपट्टीनंतर किमान १८८ देश ‘पीआयए’वर बंदी टाकू शकतात. पाकिस्तानच्या वैमानिक संघटनेने या संकटासाठी पाकिस्तानचे सरकार, यंत्रणांना जबाबदार धरले आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यापासून ब्रिटन व युरोपिय महासंघाने ‘पीआयए’वर टाकलेल्या बंदीमुळे पाकिस्तानच्या विमान कंपनीला किमान अडीचशे अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीने ही माहिती प्रसिद्ध केली होती. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पाकिस्तानी विमान कंपनीला अधिक मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशारा या वृत्तवाहिनीने दिला होता.