ट्रम्प ७० दिवसांचे पाहूणे, पण इराणची राजवट कायम असेल – आखाती देशांना इराणची धमकावणी

तेहरान – अमेरिकेच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी सुखावलेल्या इराणने अरब देशांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘७० दिवसानंतर ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नसतील, पण इराणची राजवट कायम असणार आहे. सुरक्षेसाठी दुसर्‍या देशांवर विसंबून राहणे हा चांगला डाव ठरत नाही’, अशा बोचर्‍या शब्दात इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी आखाती देशांना धमकावले. त्याचबरोबर आपल्या इराणविरोधी भूमिकेत बदल केला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही झरीफ यांनी बजावले.

इराणची राजवट

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाच्या जो बिडेन यांचा दणदणीत विजय झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात बिडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बिडेन यांच्या निवडीचे इराणने प्रत्यक्ष स्वागत केलेले नाही. पण ट्रम्प यांचा पराभव झाल्याच्या वृत्तानंतर इराणने अमेरिकेशी सहकार्य वाढविणार्‍या अरब देशांना इशारा दिला आहे. लॅटीन अमेरिकी देशांचा दौरा करुन परतलेले इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अरब देशांचा थेट उल्लेख न करता धमकी दिली.

अमेरिकेचा उल्लेख बाहेरील देश असा करून आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेची मदत घेऊन अरब देशांनी जुगार खेळल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी केला. अरब देशांचा हा जुगार कामी येणार नसल्याचे इराणच्या परराष्ट्रमंत्री म्हणाले. ‘शेजारी देशांनी चर्चेच्या माध्यमातून इराणबरोबरील मतभेद कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकत्र आलो तरच आपण एक उज्ज्वल भवितव्य घडवू’, असा संदेश परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी दिला. आखाती देशांनी अमेरिकेशी सहकार्य सोडून इराणशी जुळवून घेतले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा छुपा संदेश झरीफ यांनी म्हटल्याचे दिसत आहे.

इराणची राजवट

इराणच्या परराष्ट्रमंत्रालयानेही अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका करुन आखाती देशांना स्पष्ट शब्दात धमकावले. ‘गेल्या काही वर्षांमध्ये ट्रम्प प्रशासनाने फारच चुकीचे निर्णय घेतले आहेत. इराणवर अधिकाधिक दडपण टाकण्याचे अमेरिकेचे प्रयत्‍न फसले आहेत’, अशी टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतिबझादे यांनी केली. तर, अमेरिकेच्या सहकार्यावर मोठ्या प्रमाणात विसंबून राहणार्‍या अरब देशांनीही इराणशी सहकार्य करावे, असे खतिबझादे यांनी बजावले आहे.

दरम्यान, जो बिडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प प्रशासनापेक्षा वेगळे धोरण स्वीकारून सौदी व इतर आखाती देशांबरोबरील सुरक्षाविषयक सहकार्य मोडीत काढतील, असा समज इराणने करुन घेतला आहे. त्याचवेळी बिडेन यांचे प्रशासन इराणबरोबरील अणूकरार नव्याने करतील, याचाही इराणला विश्वास वाटत असल्याचे या देशाकडून येत असलेल्या प्रतिक्रियेवरुन दिसत आहे. मात्र, माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याप्रमाणे राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर बिडेन यांनी इराणबाबत असा निर्णय घेतला तर इस्रायलसह सौदी अरेबिया व इतर आखाती देशांकडून त्यावर जहाल प्रतिक्रिया उमटल्यावाचून राहणार नाही. यामुळे आखाती क्षेत्रातील अमेरिकेचे हितसंबंध धोक्यात येऊ शकतात.

leave a reply