तेहरान – इराणवर कुठल्याही प्रकारे हल्ले चढविणार्या अमेरिकेला निर्णायक प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. हल्लेखोरांविरोधात इराण आपले संपूर्ण लष्करी सामर्थ्य वापरेल, अशी धमकी इराणने दिली आहे. त्याचबरोबर इराणविरोधात अपप्रचार करणार्या सौदी अरेबियाने वेळीच आपल्या भूमिकेत बदल करावा, अन्यथा या देशाची अधिक कोंडी होईल, असेही इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकावले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ल्याची तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या अहवालानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या निर्णयावर आले होते. पण ट्रम्प यांच्या मंत्र्यांनी केलेल्या विरोधानंतर इराणवरील हल्ल्याचा निर्णय तूर्तास बाजूला ठेवल्याची बातमी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली होती. यावर इराणकडून जोरदार प्रतिक्रीया उमटली आहे.
इराणवर हल्ल्याचा प्रयत्न झालाच तर निर्णायक प्रतिसादाला सामोरे जावे लागेल, असे रोहानी सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी धमकावले. तर संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे प्रतिनिधी अलीरेझा मिरयुसेफी इराणच्या अणुकार्यक्रमाचे समर्थन केले. तसेच इराणने आपल्या लष्करी सामर्थ्याची ओळख जगाला करुन दिली असून, इराणला आव्हान देणार्यांवर हल्ले चढविण्याचा पूर्ण अधिकार इराणला आहे, असे मिरयूसेफी यांनी ठणकावले.
इराणच्या आण्विक तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमावर टीका करून आंतरराष्ट्रीय समुदायाला इराणविरोधात एकजुटीचे आवाहन करणार्या सौदीलाही इराणने धमकावले. ‘सौदीचे राज्यकर्ते आपल्या भूमिकेत बदल करीत नाही, तोपर्यंत सौदीला बहिष्कारापासून कुणीही वाचवू शकत नाही’, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमावर टीका करणार्या सौदी व इस्रायलने आपल्या अणुकार्यक्रमाबाबात स्पष्टता बाळगावी, असे इराणने फटकारले.
अमेरिकेतील निवडणुकीत जो बिडेन यांना बहुमत मिळाले असले तरी अजूनही राष्ट्राध्यक्षदावर असलेले डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला चढविण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसे संकेत ट्रम्प प्रशासनाकडून दिले जात आहेत. तर या निवडणुकीत बिडेन यांचा विजय झाल्यास, इस्रायल इराणवर हल्ला चढविल, अशी धमकी इस्रायलच्या एका नेत्याने दिली होती. बिडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, इराणबरोबरील अणुकरार नव्याने करण्याचा विचार केलाच, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे इस्रायल वारंवार बजावत आहेत.
यामुळे अस्वस्थ झालेल्या इराणकडून आपल्यावरील हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल, असे इशारे दिले जात आहेत. याआधीही इराणने आपल्यावरचा हल्ला म्हणजे युद्धाची घोषणा मानली जाईल, असे धमकावले होते.