नवी दिल्ली – भारतात हेरगिरी करणाऱ्या आणि ‘मनी लॉन्डरिंग’चे रॅकेट चालविण्याच्या चिनी हेरांच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. चिनी हेरांना पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ची मदत मिळत होती, असा दावा गृहमंत्रालयाच्या हवाल्याने करण्यात आला आहे. तसेच या ‘मनी लॉन्डरिंग’द्वारे मिळणारा पैसा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला भारतात घातपाती कारवाया माजविण्यासाठी पुरविण्यात येणार होता, असेही समोर येत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चिनी हेरगिरी टोळीचा पर्दाफाश झाला होता. यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली होती.
चीन भारतात हेरगिरीचे जाळे पसरविण्याबरोबर भारताच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचविण्यासाठी प्रयत्नात होता. यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची मदत चीनला मिळत होती. सुमारे हजार कोटीचे हवाला रॅकेट उभारण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यात देशात काही चिनी कंपन्या आणि त्यांच्या भारतीय सहकारी कंपन्यांच्या ठिकाणावर आयकर विभागाने छापे टाकले होते. यामध्ये या ‘मनी लॉन्डरिंग रॅकेट’चा खुलासा झाला होता आणि चौकशीनंतर चार्ली पेंग उर्फ लिओ सांग या चिनी नागरिकाला अटक झाली होती. शेल कंपन्या आणि 40 बँक खात्यांच्या माध्यमातून ही मनी लॉन्डरिंग होत होती. दरदिवशी सुमारे तीन कोटीहून अधिक रुपये चार्ली पेंग चीनमध्ये छुप्या पद्धतीने पाठवत होता. या हवाला रॅकेटचा संबंध थेट चिनी लष्कराशी होता. तसेच दलाई लामांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि भारतात राहणाऱ्या तिबेटींच्या ठिकाणांची माहिती काढण्याचे कामही चार्ली पेंग हा चीनची गुप्तचर संघटना ‘मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी’साठी (एमएमएस) करीत होता.
चार्ली पेंगने चौकशीत झालेल्या खुलाशानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये चिनी महिला ‘किंग शी’, तिचा नेपाळी साथीदार शेर बहादूर तसेच या सर्वाना माहिती पुरविण्यास मदत करणाऱ्या राजीव शर्मा नावाच्या मुक्त पत्रकारही अटक करण्यात आली होती. ‘किंग शी’च्या चौकशीत तिने पंतप्रधान कार्यालयापासून ते महत्वाच्या सरकारी खात्यात हेरगिरी करण्याचे आणि माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते, असा धक्कादायक खुलासा केला होता.
आता यासंदर्भांत आणखी माहिती समोर आली असून चीनला भारतात हेरगिरीचे जाळे तयार करण्यासाठी आणि हवाला रॅकेटच्या विस्तारासाठी पाकिस्तानच्या ’आयएसआयची’ही साथ मिळत होती, अशी कबुली अटकेतील या चिनी हेरांनी दिली आहे, असे वृत्त आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच भारत अस्थैर्य आणि अशांतता माजविण्यासाठी मनी लॉन्डरिंचा हा पैसा’आयएसआय’ला पुरविण्यात येणार होता, असा दावाही करण्यात आला आहे. चीन-पाकिस्तानचे हे नेक्सस गंभीर चिंतेचा विषय असून या संदर्भांत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी याआधी इशारा दिला होता.