अमेरिका आशिया-पॅसिफिक क्षेत्रात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे

- चीनचे टीकास्त्र

आशिया-पॅसिफिकबीजिंग/मनिला – अमेरिका आपले स्वार्थी हितसंबंध जपण्यासाठी आशिया-पॅसिफिक क्षेत्रात अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत आहे, असे टीकास्त्र चीनने सोडले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी नुकताच व्हिएतनाम व फिलिपाईन्सचा दौरा केला. या दौऱ्यात ओब्रायन साऊथ चायना सीमधील वादात अमेरिका आशियाई देशांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली होती. त्याविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षात चीनच्या साऊथ चायना सीमधील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कृत्रिम बेटांची उभारणी, वाढती संरक्षण तैनाती, नवे कायदे आणि शेजारी देशांना सातत्याने देण्यात येणाऱ्या धमक्या या माध्यमातून चीन संपूर्ण ‘साऊथ चायना सी’ गिळण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनविरोधात वाढलेला असंतोष आणि अमेरिकेसह जगातील आघाडीच्या देशांनी घेतलेले आक्रमक धोरण यामुळे चीनच्या या प्रयत्नांना धक्के बसले आहेत. त्यातच साऊथ चायना सीचा भाग असणाऱ्या आग्नेय आशियाई देशांनीही चीनविरोधात आग्रही भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

आशिया-पॅसिफिक

या भूमिकेमागे अमेरिका व मित्रदेशांनी दिलेली सहकार्याची ग्वाही हा महत्त्वाचा घटक ठरतो. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी व्हिएतनाम व फिलिपाईन्सला दिलेली भेटही त्याचाच भाग आहे. ‘अमेरिका या क्षेत्रात कायम राहणार आहे आणि तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे. अमेरिका हे क्षेत्र सोडून जाणार नाही. सामर्थ्याच्या बळावर शांतता प्रस्थापित करणे हा एकच मार्ग चीनला रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल. याच मार्गाने या क्षेत्रात शांतता नांदेल’ या शब्दात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आग्नेय आशियाई देशांना पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी अमेरिकेकडून फिलिपाईन्सला सुमारे दोन कोटी डॉलर्सची क्षेपणास्त्रे तसेच इतर शस्त्रेही देण्यात आली.

आशिया-पॅसिफिक

अमेरिकेच्या सल्लागारांनी दिलेली ग्वाही व पुरवलेली शस्त्रास्त्रे यामुळे चीन चांगलाच बिथरल्याचे दिसत आहे. चीनच्या फिलिपाईन्समधील दूतावासाने अमेरिकेवर थेट अराजक माजवित असल्याचा आरोप ठेवला. त्याचवेळी अमेरिका शीतयुद्धकालिन मानसिकतेतून बाहेर पडली नसल्याचा व साऊथ चायना सीमध्ये संघर्ष भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपकाही ठेवला. अमेरिका फक्त आपले हितंसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही चिनी दूतावासाच्या निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान, आग्नेय आशियाई देशांमधील आघाडीचा देश असणाऱ्या इंडोनेशियाने चीनच्या कारवायांना शह देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, इंडोनेशियन नौदलातील आघाडीचे पथक ‘साऊथ चायना सी’मधील ‘नातुना आयलंड’ भागात तैनात करण्यात येणार आहे. इंडोनेशियाचे नौदल प्रमुख ॲडमिरल युदो मार्गोनो यांनी ही माहिती दिली. चीनने साऊथ चायना सीमधील याच क्षेत्रावर दावा सांगितला असल्याने इंडोनेशियाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

leave a reply