देशात येणाऱ्या ‘थेट परकीय गुंतवणुकीत’ लक्षणीय वाढ

नवी दिल्ली – जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) लक्षणीय वाढ झाली आहे. या तिमाहीमध्ये देशात 28.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली असून गेल्या वर्षी याच तिमाहीत देशातील एफडीआयचे प्रमाण 14.06 अब्ज डॉलर्स इतके होते. त्यामुळे ‘एफडीआय’मध्ये झालेली ही लक्षणीय वाढ जागतिक गुंतवणूकदार भारताकडे अधिक प्रमाणात आकर्षित झाल्याचे दाखवून देत असल्याचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

गेल्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत, 2020-2021 च्या पहिल्या सहा महिन्यातील एफडीआयमध्ये 15 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यावर्षाच्या जुलै महिन्यातच 17.5 अब्ज डॉलर्स इतकी ‘एफडीआय’ भारतात आली. यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर व सेवा क्षेत्र, वाहन तसेच रसायन क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या काळात भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूर आघाडीवर असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा क्रमांक लागतो. सिंगापूरमधून 8.3 अब्ज डॉलर्स तर अमेरिकेतून 7.12 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

या वाढलेल्या गुंतवणुकीचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी स्वागत केले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारताकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे गोयल म्हणाले. दरम्यान, जगाची फॅक्टरी अशी ओळख मिळालेल्या चीनमधून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आता काढता पाय घेत आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी भारताने तयारी करावी, असे आवाहन अर्थतज्ज्ञ करीत आहेत. यासाठी भारताने तयारी केली असून आपला देश आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीचे केंद्र बनण्यास सज्ज होत असल्याचे भारताच्या नेतृत्त्वाने जाहीर केले होते.

याचे परिणाम दिसू लागले असून भारतातील गुंतवणूक अधिक शाश्‍वत असल्याची खात्री आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना पटू लागली आहे. विशेषतः भारताची मोठी बाजारपेठ व भारतीय ग्राहकांकडील क्रयशक्ती हे आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमुख कारण ठरत आहे. याचे फार मोठे लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार असून नजिकच्या काळात भारतातील रोजगारनिर्मितीला यामुळे चालना मिळणार आहे.

leave a reply