वॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेने ‘न्यूक्लिअर सुपरकॅरिअर’ म्हणून ओळख असलेली आपली विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ पर्शियन आखातात तैनात केली आहे. शुक्रवारी इराणमध्ये झालेल्या अणुशास्त्रज्ञांच्या हत्येनंतर ही तैनाती लक्ष वेधून घेणारी ठरते. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या सर्वात महत्त्वाच्या नातांझ अणुप्रकल्पावर हवाई हल्ले चढविण्याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर अमेरिकेची ‘बी-52एच बॉम्बर्स’ अण्वस्त्रवाहू विमानेही आखातात दाखल झाली होती. त्यापाठोपाठ ‘युएसएस निमित्झ’च्या पर्शियन आखातातील तैनातीमुळे इथले वातावरण स्फोटक बनले आहे. अमेरिकी नौदलाच्या बाहरिनस्थित ‘फिफ्थ फ्लीट’ने ‘युएसएस निमित्झ’च्या तैनातीची माहिती दिली. ‘निमित्झ कॅरिअर स्ट्राईक ग्रुपच्या पर्शियन आखातातील तैनातीमागे कोणताही विशिष्ट धोका असल्याचे संकेत नाहीत. या तैनातीतून अमेरिकेकडे सर्व प्रकारच्या धोक्यांचा यशस्वी मुकाबला करण्याची योग्य क्षमता असल्याचे स्पष्ट दिसून येते. अमेरिका इराक व अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेत आहे. त्यात शत्रूदेशांकडून अडथळे येऊ नयेत म्हणून ही तैनाती करण्यात येत आहे’, असे ‘फिफ्थ फ्लीट’च्या प्रवक्त्या कमांडर रिबेका रेबॅरिच यांनी सांगितले.
यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणचे वरिष्ठ कमांडर कासेम सुलेमानी यांना लक्ष्य केले होते. सुलेमानी यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली आखातातील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली होती. त्याचीच पुनरावृत्ती सध्या होताना दिसत आहे. मात्र अमेरिकेतील लष्करी सूत्रांनी सध्याची पर्शियन आखातातील तैनाती व इराणी अणुशास्त्रज्ञांची हत्या यांचा संबंध नसल्याचा दावा केला आहे.
इराणकडून आपल्या अणुप्रकल्पांमध्ये मर्यादेपेक्षा 12 पट अधिक युरेनियमचे संवर्धन होत असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. इराणने गेल्या काही महिन्यात आखाती देशांविरोधातील धमक्यांचा सूरही अधिक तीव्र केला आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कारकिर्द संपण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायल इराणविरोधात लष्करी मोहीम छेडण्यासाठी वेगाने पावले उचलू शकतात. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी नुकताच आखाती देशांचा दौराही केला होता.
त्यामुळे बॉम्बर्सची तैनाती व त्यापाठोपाठ ‘न्यूक्लिअर सुपरकॅरिअर युएसएस निमित्झ’ पर्शियन आखातात दाखल होणे ही अमेरिकेची मोठी व्यूहरचनात्मक खेळी असू शकते, असा दावा विश्लेषक करीत आहेत. ‘युएसएस निमित्झ’ ही जगातील सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकांपैकी एक असून त्यावर पाच हजारांहून अधिक जवान व 80हून अधिक विमाने तैनात आहेत. काही दिवसांपूर्वी, अमेरिकेचे इराणवरील हल्ल्याचे डावपेच आखातातील व्यापक युद्धाला आमंत्रण देणारे असतील, असा इशारा इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे लष्करी सल्लागार हुसेन देहघान यांनी दिला होता.