अमेरिकेत 24 तासांमध्ये कोरोनाचे तीन हजारांहून अधिक बळी

- एकूण रुग्णांची संख्या दीड कोटींवर

वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोनाच्या साथीत दगावणाऱ्यांच्या संख्येत भयावहरित्या वाढ होत असल्याचे समोर येत आहे. बुधवारी 24 तासांच्या अवधीत अमेरिकेत कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर एखाद्या देशात एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील ‘आयएचएमई’ या संस्थेने अमेरिकेसह जगभरात कोरोनाच्या साथीत बळी जाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढू शकते, असा इशारा दिला होता.

अमेरिकेतील कोरोनाच्या साथीची माहिती ठेवणाऱ्या ‘द कोविड ट्रॅकिंग प्रोजेक्ट’ने बुधवारची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 24 तासांच्या अवधीत अमेरिकेत 2 लाख, 9 हजार, 822 रुग्ण नोंदविण्यात आले असून 3,054 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या साथीमुळे एखाद्या देशात 24 तासांमध्ये तीन हजारांहून अधिक बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 7 मे रोजी अमेरिकेत 2,769 रुग्ण दगावल्याची नोंद झाली होती. अमेरिकेत कोरोनाच्या साथीत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख, 88 हजार, 185 वर गेली आहे. तर रुग्णांची एकूण संख्या एक कोटी, 53 लाख, 12 हजार, 981वर पोहोचली आहे.

जगभरात सध्या कोरोना साथीची दुसरी लाट सुरू असल्याचे सांगण्यात येते. या लाटेत रुग्णांची तसेच बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, रशिया व आशियातील काही देशांमध्ये रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा वेगाने वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचा भाग असलेल्या ‘आयएचएमई’ने ‘कोविड-19 प्रोजेक्शन्स’ अंतर्गत तयार केलेल्या अहवालातही बळींची संख्या वाढण्याबाबत इशारा दिला होता. येत्या चार महिन्यात जगभरात कोरोनामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या 30 लाखांवर जाऊ शकते असे या संशोधन संस्थेने बजावले होते. त्यात अमेरिकेतील बळींची संख्या 1 एप्रिलपर्यंत पाच लाख 39 हजारांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये कोरोनाची साथ रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ब्रिटनव्यतिरिक्त रशिया व चीननेही आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आहे. कॅनडाने ‘फायझर’च्या लसीला मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. तर अमेरिकेत येत्या काही दिवसात लसींना मान्यता मिळेल असे संकेतही देण्यात आले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर युरोपात लसीकरणाला मान्यता देणारी वैद्यकीय यंत्रणा ‘युरोपियन मेडिसिन्स एजन्सी’वर सायबरहल्ला झाल्याची घटना उघड झाली आहे.

या सायबरहल्ल्यात ‘युरोपियन मेडिसिन्स एजन्सी’कडील ‘फायझर’ लसीसंबंधातील माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ‘आयबीएम’ या बहुराष्ट्रीय कंपनीने तसेच इंटरपोलने लस तयार करणाऱ्या कंपन्या तसेच त्यात सहभागी असलेल्या घटकांना लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा दिला होता. त्यापूर्वी जगातील आघाडीच्या गुप्तचर यंत्रणांनी रशिया व चीनकडून कोरोनाच्या लसीसंदर्भातील संशोधन चोरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बजावले होते.

leave a reply