न्यूयॉर्क – संयुक्त अरब अमिरातीला (युएई) अतिप्रगत ‘एफ-35’ विमाने तसेच इतर शस्त्रास्त्रे पुरविण्यासंबंधी अमेरिकेच्या सिनेटमध्ये ठेवलेला ठराव पारित करण्यात आला. डेमोक्रॅट पक्षाने केलेल्या विरोधानंतर सदर ठराव संमत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘विटो’ वापरण्याचा इशारा दिला होता. पण सिनेटच्या या निर्णयानंतर 23 अब्ज डॉलर्सच्या या संरक्षण सहकार्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्रायलने देखील ‘युएई’ला ‘एफ-35’ विमाने पुरविण्यास आपली हरकत नसल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘युएई’ या अमेरिकेच्या मित्रदेशाला ‘एफ-35’ स्टेल्थ लढाऊ विमाने, ‘एमक्यू9 रिपर ड्रोन्स’ आणि इतर शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केली होती. यासंबंधीचा ठराव अमेरिकेच्या सिनेटमध्ये सादर करून ज्यो बायडेन सत्तेवर येण्याआधी यास मंजुरी मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घाई केली होती. पण येमेनमधील संघर्षात गुंतलेला ‘युएई’ वंशसंहाराचा दोषी असल्याचा ठपका ठेवून सिनेटमधील डेमोक्रॅट्सनी सदर ठराव पारित करणार नसल्याचे जाहीर केले होते. तर खवळलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नकाराधिकार वापरुन सदर ठराव पारित करणार असल्याचे ठणकावले होते.
त्या पार्श्वभूमीवर, बुधवारी अमेरिकन सिनेटमध्ये या ठरावावर झालेल्या मतदानात ‘एफ-35’च्या विक्रीला 49-47 तर रिपर ड्रोन्सच्या विक्रीला 50-46 अशा फरकाने मंजुरी मिळाली. डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह रिपब्लिकन नेत्यांनी याचे स्वागत केले. ‘युएई’ला अतिप्रगत लढाऊ विमाने पुरविण्यास सुरुवातीला नकार देणाऱ्या इस्रायलनेही सदर सहकार्याबाबत आपल्याला काहीच हरकत नसल्याचे अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत रॉन डर्मर यांनी स्पष्ट केले. तर अमेरिकेतील इस्रायल समर्थक ‘आयपॅक’ या गटानेही याचा विरोध करणार नसल्याचे सांगितले.
इस्रायल आधीपासूनच ‘एफ-35’ लढाऊ विमानांनी सज्ज आहे. सिरियातील हवाई हल्ल्यांसाठी इस्रायलने या स्टेल्थ लढाऊ विमानांचा वापर केल्याचा दावा केला जातो. ही अतिप्रगत विमाने अमेरिकेने आखातातील अरब मित्रदेशांना पुरवू नये, अशी भूमिका इस्रायलने घेतली होती. पण काही महिन्यांपूर्वी अमेरिका व इस्रायलमध्ये झालेल्या सहकार्यानंतर इस्रायलच्या भूमिकेत बदल झाला आहे. तर अमेरिकेने ‘युएई’ला ‘एफ-35’ विमानांनी सज्ज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर इराणमधून संतप्त प्रतिक्रिया अपेक्षित आहे. अमेरिका इराण विरोधातच युएईला या लढाऊ विमानांची विक्री करीत असल्याचा आरोप इराणने याआधीच केला होता.
दरम्यान, इराणचा अणुकार्यक्रम तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती आखातातील तणावासाठी जबाबदार असल्याचा आरोप अमेरिका, इस्रायल, सौदी अरेबिया, युएई यांनी केला आहे. तर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या तीन युरोपिय देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाने देखील इराणच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. मात्र आखातातील तणावासाठी इराण जबाबदार नसून इस्रायल आणि अरब देशांमधील संघर्ष कारणीभूत असल्याचा दावा इस्रायलमधील रशियन राजदूत अँटोली विक्टोरोव्ह यानी केला. सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील हल्ल्यांमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाल्याचा आरोप विक्टोरोव्ह यांनी केला आहे.