अंकारा – दोन वर्षाच्या तणावानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी इस्रायलसाठी राजदूत नेमला. 2018 साली गाझापट्टीवरील इस्रायलच्या कारवाईनंतर तुर्कीने इस्रायलमधून राजदूत माघारी बोलविला होता. त्यानंतर आता तुर्कीने इस्रायलसाठी राजदूत नियुक्त केला आहे. इस्रायलशी पुन्हा सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी तुर्कीने छुप्या हालचाली सुरू केल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा प्रशंसक तसेच जेरूसलेमच्या हिब्रू विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलेल्या ‘युफूक युलूतास’ यांच्यावर राजदूत पदाची जबाबदारी सोपविली आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर तुर्कीला संबंध सुधारायचे आहेत. इस्रायलशी संबंध सुधारले तर अमेरिकेबरोबरच्या सुदृढ सहकार्याचा मार्ग खुला होईल, असे तुर्कीला वाटत आहे. यासाठी तुर्की इस्रायलसाठी राजदूताची नेमणूक करीत असल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे.
2018 साली इस्रायली लष्कराने गाझापट्टीत हमासच्या दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईत 60 हून अधिक जण ठार झाले होते. या कारवाईमुळे चिडलेल्या तुर्कीने इस्रायल दहशतवादी देश असल्याचा आरोप करुन इस्रायलच्या राजदूताला अपमानित करुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर इस्रायलने देखील तुर्कीच्या राजदूताला जशास तशी वागणूक दिली होती.
दरम्यान, इस्रायलबरोबरचे संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी तुर्कीचे प्रयत्न सुरू असताना तुर्की आणि इराणमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. अझरबैझानमधील कार्यक्रमात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानांवर इराणने संताप व्यक्त केला आहे. तर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याविषयी इराणने वापरलेल्या भाषेचा तुर्कीने निषेध केला आहे.