इस्रोकडून दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा – गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘सीएमएस-०१’ या दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले. कोरोनाच्या काळात राबविलेली इस्रोची ही दुसरी मोहीम होती. हा दूरसंचार उपग्रह ११ वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेल्या ‘जीसॅट-२’ या दूरसंचार उपग्रहाची जागा घेणार आहे. यामुळे दूरसंचार सेवा अधिक भक्कम होईल. लक्षद्वीप तसेच अंदमान निकोबार क्षेत्रातही ‘सी बॅण्ड’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपग्रह महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

इस्रोकडून ‘पीएसएलव्ही-सी५०’ या रॉकेट प्रक्षेपकाच्या सहाय्याने ‘सीएमएस-०१’ या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘सीएमएस-०१’ हा इस्रोने अवकाशात सोडलेला ४२ वा दूरसंचार उपग्रह आहे. पीएसएलव्ही रॉकेट प्रक्षेपकाच्या सहाय्याने आखण्यात आलेली ही ५२ वी मोहिम ठरली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरच्या दुसर्‍या तळावर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला.

‘सीएमएस-०१’ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन झाला असून तो व्यवस्थित कार्य करीत आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. या यशाबद्दल त्यांनी संशोधकांचे अभिनंदनही केले. हा उपग्रह देशातील ‘सी बॅण्ड’ सेवेच्या विस्तारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील महिन्यापासून हा उपग्रह पूर्णपणे कार्यरत होणार असून सात वर्ष कार्यरत असेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. याआधी इस्रोने ७ नोव्हेंबरला ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’चे (ईओएस-०१) प्रक्षेपण केले होते. ‘ईओएस-०१’ हा उपग्रह कोणत्याही वातावरणात हाय रिझोल्युशनचे फोटो काढू शकतो. त्यामुळे लष्करी टेहळणीसाठी या उपग्रह महत्त्वाचा मानला जातो.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे इस्रोच्या काही मोहिमा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यात ‘मिशन चंद्रयान-३’, ‘मिशन आदित्य एल-१’ व ‘गगनयान’चा समावेश असून त्यासंदर्भातील पुढील माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

leave a reply