परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कतारच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा कतार दौरा सुरू झाला आहे. या दौर्‍याच्या आरंभी आपण कतारच्या व्यापार व उद्योगक्षेत्रातील नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिली. यावेळी आत्मनिर्भर भारत अभियानामुळे निर्माण झालेल्या संधीची माहिती कतारच्या उद्योगक्षेत्राला दिल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. गेल्या चार महिन्यांपासून भारतीय नेते पश्‍चिम आशियाई देशांचे दौरे करीत आहेत. तसेच या क्षेत्रातील देशांकडून भारतात होणार्‍या गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होत आहे. तसेच या देशांबरोबरील भारताचे धोरणात्मक सहकार्य अधिकाधिक दृढ बनत चालल्याचे भारतीय नेत्यांच्या या दौर्‍यांमुळे स्पष्ट होत आहे.

कतार भारताला इंधनाचा पुरवठा करणारा महत्त्वाचा आखाती देश आहे. २०१९-२० या वित्तीय वर्षात उभय देशांमध्ये सुमारे १०.९५ अब्ज डॉलर्स इतका व्यापार झाला होता. कतारमध्ये सात लाख भारतीय कामगार कार्यरत आहेत. पुढच्या काळात भारतातील आपली गुंतवणूक वाढविण्याचा निर्धार कतारने केला आहे. यासाठी दोन्ही देशांनी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कतारचे अमीर ‘शेख तमिम बिन हमाद अल-थानी’ यांच्यात या महिन्यात फोनवरून चर्चा पार पडली होती. या चर्चेत सदर टास्क फोर्सच्या स्थापनेचा निर्णय झाला होता. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची कतार भेट हा या सहकार्याचा भाग असल्याचे समोर येत आहे.

सप्टेंबर महिन्यात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एससीओ’च्या बैठकीसाठी जाताना इराणला भेट दिली होती. तर नोव्हेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ‘युएई’ व बाहरिन या आखाती देशांचा दौरा केला होता. तर काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ‘युएई’ व ‘सौदी अरेबिया’ला भेट दिली होती. भारतीय लष्करप्रमुख अशारितीने पहिल्यांदाच अशारितीने सौदी व युएईच्या दौर्‍यावर गेले होते व त्यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचे मानले जाते. तर उपपरराष्ट्रमंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही नुकतीच ओमानला भेट दिली होती.

भारतीय नेते व लष्करप्रमुखांच्या या दौर्‍यामुळे पश्‍चिम आशियाई क्षेत्रातील भारताचे सहकार्य अधिकाधिक दृढ होऊ लागल्याचे दिसत आहे. अमेरिकेत बायडेन यांचे प्रशासन सत्ता हाती घेण्याची तयारी करीत आहे. त्यांच्या इराणबाबतच्या धोरणामुळे आखाती देशात अस्वस्थता पसरलेली आहे. त्याचवेळी कोरोनाच्या साथीमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर समस्या खड्या ठाकल्या आहेत. आत्तापर्यंत इंधनाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या आखाती देशांनी यावरील अवलंबित्त्व कमी करण्याची तयारी केली आहे. तसेच हे देश गुंतवणुकीसाठी विश्‍वासार्ह पर्याय शोधत आहेत.

यामुळे भारताचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले असून पश्‍चिम आशियाई देशांनी भारताबरोबरील व्यापार तसेच गुंतवणूक वाढविण्यासाठी झपाट्याने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. भारतीय नेत्यांच्या पश्‍चिम आशियाई देशांमधील वाढत्या दौर्‍याला ही पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. तर पाकिस्तानवर हल्ला चढविण्यासाठी पश्‍चिम आशियाई देशांचे समर्थन मिळविण्यासाठी भारत या हालचाली करीत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला होता. भारताने हा आरोप फेटाळला आहे.

पुढच्या काळात आखाती देश भारताची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानी कामगारांची हकालपट्टी करून, त्यांच्या जागी भारतीय कामगारांची नेमणूक करतील, अशी भीती पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत. तसे झाले तर त्याचा फार मोठा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसेल आणि भारताला तेच हवे आहे, असे या पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे. मात्र भारत अशारितीने आक्रमक परराष्ट्र धोरणावर काम करीत असताना, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका या पत्रकारांकडून करण्यात येत आहे.

leave a reply