इस्लामाबाद – ‘एफएटीएफ’ची कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तानने ‘झकीउर रेहमान लख्वी’ याला शिक्षा सुनावण्याचे नाटक केल्याचा आरोप भारताने केला होता. हा आरोप पाकिस्तानला चांगलाच झोंबल्याचे दिसत आहे. ‘एफएटीएफ’ची कारवाई आणि लख्वीबाबत पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेली शिक्षा याचा काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानकडून यावर खुलासा येत असताना, अमेरिकेनेही लख्वीला झालेल्या शिक्षेवरून पाकिस्तानची कानउघडणी केली आहे. मुंबईतील २६/११चा दहशतवादी हल्ला घडविण्याचा आरोप ठेवून लख्वीवर ठेवून कारवाई करा, असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लख्वी याला दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याच्या आरोपाखाली दोषी ठरविले व तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या न्यायालयाने ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांवर ही कारवाई सुरू झाल्याचे नाटक उभे करीत असल्याचा आरोप भारताने केला होता. विशेषतः लख्वीला झालेली शिक्षा म्हणजे धूळफेक असल्याचा ठपका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ठेवला. लवकरच ‘एफएटीएफ’ची बैठक सुरू होईल. त्याच्या आधी दहशतवाद्यांवर कारवाईचे नाटक पाकिस्तान पार पाडत असल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले होते.
ही टीका पाकिस्तानला चांगलीच झोंबलेली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झहीद हफीज चौधरी यांनी एफएटीएफच्या कारवाईचा व लख्वीला झालेल्या शिक्षाचे काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. याबाबत भारताने पाकिस्तानवर केलेले आरोप विद्वेषी असल्याची टीकाही चौधरी यांनी केली. तसेच पाकिस्तानच्या न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलण्याचा भारताला अधिकार नसल्याचेही चौधरी यांनी म्हटले आहे. मात्र पाकिस्तान हा खुलासा करून आपला बचाव करीत असताना, अमेरिकेकडून आलेली प्रतिक्रिया पाकिस्तानवर दडपण वाढवित आहे.
लख्वीला पाकिस्तानच्या न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले. पण दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याहून कितीतरी भयंकर अपराध लख्वीने केलेले आहेत, याची आठवण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व मध्य आशिया विभागाने करून दिले. २६/११चा सूत्रधार असलेल्या लख्वीवर पाकिस्तानने या गुन्ह्यासाठी खटला चालवावा, अशी मागणी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या या विभागाने केली आहे.
दरम्यान, जागतिक दहशतवादाचे केंद्र अशी पाकिस्तानची प्रतिमा बनलेली असून या देशाची पुरती नाचक्की झालेली आहे. पाकिस्तान आपले हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करीत आला आहे, ही बाब भारत जगभरातील प्रमुख देशांना वारंवार पटवून देत आहे. त्याचे परिणाम दिसू लागले असून चीन व तुर्कीसारख्या काही देशांचा अपवाद वगळता जगातील इतर प्रमुख देश पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका स्वीकारू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य बनलेल्या भारताने पुढच्या काळात सुरक्षा परिषदेतही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानला घेरण्याची तयारी केलेली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारण्यासाठी धडपड करीत आहे. भारत आपल्या प्रभावाचा वापर करून पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीत टाकणार असल्याची भीती पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करू लागली आहेत.
तसे झाले तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज मिळणार नाही व या देशात येणारी गुंतवणूकही थांबेल. याचे विपरित परिणाम होतील, अशी चिंता पाकिस्तानचे विश्लेषक व्यक्त कतरीत आहेत. त्यामुळेच दहशतवाद्यांवर कारवाईचे नाटक करणे पाकिस्तानला भाग पडल्याचे दिसत आहे.