भारतीय लष्कराच्या धैर्याची परिक्षा घेण्याची चूक करू नका

- लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे

नवी दिल्ली – ‘एकतर्फी कारवाई करून एलएसीवरील परिस्थिती बदलण्याचे कारस्थान भारतीय सैन्याने उधळून लावले आहे. गलवानच्या खोर्‍यात शहीद झालेल्या २० सैनिकांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. पुढच्या काळातही देशाचे सार्वभौमत्त्व व सुरक्षा यांना भारतीय लष्कर कुठल्याही प्रकारचा धक्का लागू देणार नाही. भारतीय लष्कराच्या धैर्याची कुणीही परिक्षा घेऊ नये’, असे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी बजावले आहे. ‘आर्मी डे परेड’ला संबोधित करताना लष्करप्रमुख बोलत होते. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर ३०० ते ४०० दहशतवादी घुसखोरीसाठी तयार असल्याची माहिती देऊन लष्करप्रमुखांनी पाकिस्तानलाही चांगलेच खडसावले आहे.

एकाच दिवसापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जगातील कितीही मोठ्या शक्तीने भारताच्या आत्मसन्मानाला धक्का दिल्यास, त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले होते. हा चीनसाठी इशारा असल्याचे बोलले जाते. यानंतर लष्करप्रमुखांनी चीनला समज दिल्याचे दिसत आहे. लडाखच्या एलएसीवर एकतर्फी कारवाई करून इथली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला, असे सांगून लष्करप्रमुखांनी चीनला लक्ष्य केले. तसेच भारतीय लष्कराच्या धैर्याची परिक्षा घेऊ नका, असे सांगून चीनला नेमक्या शब्दात लष्करप्रमुखांनी संदेश दिल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रामध्ये चीनच्या लष्कराच्या हालचाली वाढल्याची नोंद केली जात आहे. चीन पुन्हा एकदा या क्षेत्रात भारतावर कुरघोडीचे प्रयत्न करणार असल्याचे संकेत याद्वारे मिळू लागले असून यासाठीच भारताकडून सातत्याने चीनला इशारे दिले जात आहेत.

लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्यासाठी चीनबरोबर चर्चेच्या आठ फेर्‍या संपन्न झाल्या आहेत. या चर्चेची ९ वी फेरी देखील लवकरच पार पडेल. भारत राजनैतिक वाटाघाटीद्वारे हा वाद सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. पण एकतर्फी कारवाईद्वारे या क्षेत्रातील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारत कधीही खपवून घेणार नाही, असे जनरल नरवणे यांनी बजावले आहे. याबरोबरच पाकिस्तानला जडलेली दहशतवादाची खोड अजूनही कायम असून या सवयीपुढे हा देश लाचार बनलेला आहे. काश्मीरच्या नियंत्रण रेषेपलिकडे सुमारे ३०० ते ४०० दहशतवादी घुसखोरीसाठी तयार आहेत, ड्रोन्स आणि टनेलद्वारे शस्त्रांची तस्करी करून पाकिस्तान दहशतवाद्यांना सहाय्य करू पाहत असल्याचे घणाघाती आरोप लष्करप्रमुखांनी यावेळी केले.

काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील संघर्षबंदीचे उल्लंघन ४४ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र भारतीय लष्कर त्याला जबरदस्त प्रत्युत्तर देत आहे. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने जम्मू व काश्मीरमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये २०० दहशतवादी ठार झाले. यामुळे जम्मू व काश्मीरमधील हिंसाचार खूपच कमी झाला, असे सांगून जनरल नरवणे यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.

दरम्यान, भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पुरविले जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, डायरेक्टेड एनर्जी वेपन्स आणि स्वार्म ड्रोन्स यांचा संरक्षणक्षेत्रात वापर वाढला आहे. यासाठी भारतीय लष्कर देशातील ‘आयआयटीज्’सारख्या शैक्षणिक संस्थांबरोबर काम करीत आहे, अशी लक्षवेधी माहिती यावेळी लष्करप्रमुखांनी दिली.

leave a reply