रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधातील निदर्शनांवर पोलिसांची आक्रमक कारवाई

- ३५०हून अधिक निदर्शकांना अटक

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात राजधानी मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. पुतिन यांचे विरोधक असणार्‍या अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांना झालेल्या शिक्षेच्या विरोधात ही निदर्शने सुरू झाली आहेत. रशियन सुरक्षायंत्रणांनी निदर्शने रोखण्यासाठी आक्रमक कारवाई केली असून ३५०हून अधिक निदर्शकांना अटक केली आहे. नॅव्हॅल्नी यांना झालेली शिक्षा व निदर्शकांवरील कारवाईवर पाश्‍चात्य जगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अ‍ॅलेक्सी नॅव्हल्नी यांच्यावर घातक विषप्रयोग झाला होता. त्यावरील उपचारांसाठी त्यांना जर्मनीत स्थलांतरित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी नॅव्हल्नी रशियात माघारी आले होते. रशियात आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. सध्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुरुंगवासाची मुदत असली तरी ती वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते. आपल्याविरोधात रशियन राजवटीकडून सुरू असणारी कारवाई चुकीची असल्याचा दावा करून नॅव्हल्नी यांनी आपल्या समर्थकांना निदर्शने छेडण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देऊन शनिवारी राजधानी मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये नॅव्हल्नी यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले. तापमान उणे ३० अंश असतानाही निदर्शनांना जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा नॅव्हल्नी समर्थकांकडून करण्यात आला आहे. राजधानी मॉस्कोत सुमारे पाच हजार समर्थकांनी ‘शेम, शेम’चे फलक झळकावित आक्रमक घोषणा दिल्या. यावेळी सुरक्षायंत्रणांकडून लाठीमारासह अश्रुधुराचा वापर करण्यात आला. रशियाच्या विविध शहरांमध्ये सुरक्षायंत्रणांनी ३५०हून अधिक निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.

नॅव्हल्नी यांना झालेला तुरुंगवास व निदर्शकांवरील कारवाईविरोधात अमेरिका तसेच युरोपिय महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे. युरोपिय महासंघाने नॅव्हल्नी यांच्या सुटकेसह त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर अमेरिकेने नॅव्हल्नी यांच्या अटकेवर तीव्र चिंता व्यक्त करून सुरक्षायंत्रणांच्या कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे.

leave a reply