पॅरिस – फ्रान्सच्या लष्कराने बुर्कीना फासो या पूर्व आफ्रिकी देशात केलेल्या कारवाईत २० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. बुर्कीना फासोमध्ये घातपात घडवून दहशत निर्माण करणार्या दहशतवादी संघटनेवर ही कारवाई केल्याचे फ्रान्सच्या लष्कराने म्हटले आहे. बुर्कीना फासोच्या उत्तरेकडील भागात भागात अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनांचा मोठा प्रभाव असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
फ्रान्सच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरात बुर्कीना फासोमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम छेडण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी मालीच्या सीमेवरील बुर्कीनाबे या भागात दहशतवाद्यांची हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर फ्रेंच टायगर हेलिकॉप्टर्सनी किमान ३० मोटारसायकलींवर स्वार दहशतवाद्यांच्या पथकावर हल्ले चढविले. या कारवाईत १० दहशतवादी ठार झाल्याचे फ्रान्सच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बार्बरे यांनी सांगितले.
याच दिवशी फ्रान्सच्या ड्रोनने मालीच्या सीमेच्या दिशेने प्रवास करणार्या मोटारीला लक्ष्य केले. या हल्ल्यातही दहशतवादी ठार झाल्याचे कर्नल बार्बरे म्हणाले. तर रविवारी आणखी एका दहशतवाद्यांच्या पथकावर केलेल्या कारवाईत १० दहशतवाद्यांचा खातमा केला. बुर्कीना फासोतील दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी फ्रान्सने आपले लष्करी पथक फार आधीच तैनात केले आहे.
माली आणि नायजर या देशांच्या सीमारेषा भिडलेल्या बुर्कीना फासोमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दहशतवाद धगधगत आहे. जगातील गरीब देशांमध्ये गणना होत असलेल्या बुर्कीना फासोमध्ये अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनांबरोबरच कट्टरपंथी संघटनांनी देखील येथील अल्पसंख्यांकांवर हल्ले चढवून भीषण हत्याकांड घडविले आहेत. २०१५ सालापासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये जवळपास १,१०० जणांचा बळी गेला आहे. तर पाच लाखाहून अधिक जण विस्थापित झाले आहेत.
दरम्यान, फ्रान्सने गेल्या काही आठवड्यांपासून आफ्रिकेतील दहशतवादविरोधी कारवायांची तीव्रता वाढविली आहे. यामध्ये नायजर, माली येथील दहशतवादविरोधी कारवायांचा समावेश आहे.