टोकिओ/बीजिंग/वॉशिंग्टन – ‘म्यानमारमधील लष्करी बंडाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच प्रतिक्रिया दिल्या नाही तर हा लोकशाहीवादी देश चीनच्या पंक्तीत जाऊन बसेल. यामुळे आग्नेय आशियातील चीनचा प्रभाव वाढेल’, असा इशारा जपानचे संरक्षणमंत्री यासूहिदे नाकायामा यांनी दिला. त्याचबरोबर म्यानमारच्या लष्कराने आँग सॅन स्यू की व इतर लोकशाहीवादी नेत्यांची सुटका करावी आणि देशात पुन्हा लोकशाही सरकार प्रस्थापित करावे, अशी मागणी जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी केली. अमेरिकेनेही म्यानमारच्या लष्कराला निर्बंधांची धमकी दिली आहे. तर चीनने मात्र म्यानमारबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने समजुतीची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्यानमारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत, स्यू की यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ या पक्षाला ६० टक्के जागा मिळाल्या होत्या. पण जनरल मिन आँग हलैंग यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या म्यानमारच्या लष्कराने संसदेचे नवे सत्र सुरू होण्याआधीच स्यू की यांच्यासह राष्ट्राध्यक्ष विन मिंत व इतर सदस्यांना अटक केली. जनरल हलैंग यांनी सत्तेची सर्व सूत्रे हाती घेत वर्षभरासाठी इमर्जन्सी लागू केली.
म्यानमारच्या लष्कराचे बंड म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची टीका जपानने केली आहे. म्यानमारमधील या बंडाविरोधात लोकशाहीवादी देशांनी आत्ताच ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जपानचे संरक्षणमंत्री नाकायामा यांनी केले. ‘आपण स्वस्थ बसून राहिलो तर म्यानमार आणि चीनमधील लष्करी संबंध अधिक दृढ होतील. असे झाले तर अमेरिका, जपान आणि ब्रिटन यासारख्या लोकशाहीवादी मित्रदेशांपासून म्यानमार दूर जाईल. त्याचा या क्षेत्राला मोठा धोका संभवतो’, असा इशारा नाकायामा यांनी दिला.
म्यानमारमधील या घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्यानमारमध्ये लष्कराने लोकनियुक्त नेत्या स्यू की यांना अटक करून देशातील लोकशाहीवर थेट हल्ला चढविल्याची टीका राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली. म्यानमारने लोकशाहीच्या दिशेने पावले उचलली म्हणून अमेरिकेने या देशावरील निर्बंध काढले होते. पण म्यानमार पुन्हा लष्करी राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार असेल तर अमेरिका म्यानमारवर पुन्हा निर्बंध लादेल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले.
म्यानमारमधील बंडावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू नये, याची काळजी चीन घेत आहे. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने आता म्यानमारमध्ये राजकीय-सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी व या देशातील दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न व्हावे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र लोकनियुक्त सरकार उलथणार्या म्यानमारच्या लष्कराविरोधात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चकार शब्द उच्चारलेला नाही.