‘हल’कडून ‘स्युडो सॅटेलाईट’ आणि ‘स्कायबोर्ग’च्या धर्तीवर लढाऊ ड्रोनवर काम

- ‘हल’च्या वरिष्ठ अधिकार्‍याची माहिती

नवी दिल्ली – हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (हल) ‘स्युडो सॅटेलाईट’ विकसित करण्यावर काम करीत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील अतिउंचीवर काम करणारा उपग्रह ‘अ‍ॅटमॉस्फेरिक सॅटेलाईट’ अथवा ‘हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट’ म्हणूनही ओळखण्यात येतो. आकाशात ७० हजार फूट उंचीवर दोन ते तीन महिने राहून हा उपग्रह माहिती गोळा करू शकतो. जगातील कोणत्याही देशाने आतापर्यंत असा उपग्रह विकसित केला नसल्याचा दावा, ‘हल’चे संचालक (इंजिनिअरिंग, आर अ‍ॅण्ड डी) अरुप चॅटर्जी यांनी केला आहे. तसेच ‘हल’कडून अमेरिकेच्या ‘स्कायबोर्ग’ धर्तीवर लढाऊ ड्रोन विकसित केले जात असून शत्रू देशात घुसून मोठा हल्ला चढविण्याची क्षमता या ड्रोनमध्ये असेल, असेही चटर्जी म्हणाले. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या ‘एरो इंडिया-२०२१’मध्ये या लढाऊ ड्रोनची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे.

‘हल’कडून जगातील आतापर्यंतचा सर्वात अनोखा उपग्रह विकसित केला जात आहे. भविष्यातील या उपग्रह आकाशात अतिउंचीवरून भ्रमण करू शकेल. यासाठी एका स्टार्टअप कंपनीवर ‘हल’ काम करीत असल्याची माहिती चटर्जी यांनी दिली. ‘कम्बाईन एअर टीमिंग सिस्टिम’ (सीएटीएस-कॅट्स) कार्यक्रमाअंतर्गत ‘हल’ हा उपग्रह विकसित करीत आहे. आकाशात ७० हजार फूटावर दोन ते तीन महिने हा आभासी उपग्रह भ्रमण करू शकेल आणि अत्यंत महत्त्वाची माहिती पुरविण्याचे काम करेल, असे चॅटर्जी म्हणाले. तसेच ५० हजार फूटावर चोवीस तास भ्रमण करू शकणार्‍या उपग्रह यंत्रणेची निर्मितीही ‘कॅट्स’ कार्यक्रमाअंतर्गत केली जात आहे.

हे भविष्यातील हे तंत्रज्ञान असेल आणि हल ने मांडलेल्या या संकल्पनेला भारतीय वायुसेनेने पाठिंबा दिल्याचे, ‘कॅट्स’ कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक शशिकांत दुंधे यांनी म्हटले आहे. याच कार्यक्रमाअंतर्गत ‘हल’कडून अत्याधुनिक लढाऊ ड्रोनही विकसित केले जात आहेत. हे ड्रोन लढाऊ विमानांबरोबर उड्डाण घेतील. या लढाऊ विमानांचा वापर या ड्रोन्ससाठी ‘मदर शिप’सारखा होईल. या मदरशिपमधून चार ड्रोन बाहेर पडतील आणि स्वतंत्ररित्या काम करतील. या ड्रोन व्हेईकलला ‘कॅट्स वॉरिअर्स’ असे नाव असणार आहे.

हे लढाऊ ड्रोन शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणा व रडारला गुंगार देऊन ७०० किलोमीटर आत घुसून हल्ला करण्यास सक्षम असतील. लढाऊ विमाने आपल्या देशाच्या हवाई सीमेत राहून आकाशात या ड्रोनला प्रक्षेपित करू शकतील आणि पुढे ही ड्रोन्स शत्रू प्रदेशात घुसून हल्ले करून परत येऊ शकतील, असे चटर्जी यांनी सांगितले. तेजस, जग्वार किंवा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील इतर लढाऊ विमानांचा मदरशिप म्हणून वापर करता येऊ शकतो, असे चटर्जी म्हणाले.

याशिवाय अशाच लढाऊ ड्रोनमध्ये राहू शकणार्‍या ५ किलो इतक्या कमी वजनाच्या स्वार्म ड्रोनची निर्मिती केली जात आहे. हे ड्रोनही शत्रू प्रदेशात हल्ले चढवू शकतील आणि या ड्रोनचे नियंत्रण मदरशिप मधून केले जाईल, अशी माहितीही चटर्जी यांनी दिली.

leave a reply