बंगळुरू – २०२२ सालापर्यंत संरक्षणक्षेत्रातील देशाची आयात दोन अब्ज डॉलर्सने कमी करण्याचे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे. यासाठी संरक्षणसाहित्याच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. २०१६ ते २०१९ या काळात संरक्षणविषयक साहित्याची निर्मिती करणार्या ३७ अब्ज डॉलर्सच्या १३७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २०२५ सालापर्यंत देशातील संरक्षणविषयक उत्पादन २५ अब्ज तर याची निर्यात पाच अब्ज डॉलर्सवर न्यायची असेल, तर त्यात देशाच्या एरोस्पेस उद्योगाला महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.
बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एरो इंडिया’चा सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. यात सरकारने १२८ सामंजस्य करार केले असून तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाचे १९ करार संपन्न झालेले आहेत. तसेच एरो इंडियामध्ये १८ नवी उत्पादने प्रदर्शित करण्यात आली व ३२ महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत. यावर्षी ४५ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील कंपन्या एरो इंडियामध्ये सहभागी झाल्या. यातील २१ कंपन्यांना २०३ कोटी रुपयांची कंत्राटेही मिळालेली आहेत. हे एरो इंडियाने संपादन केलेले फार मोठे यश ठरते, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी त्यावर समाधान व्यक्त केले.
सध्या ११ अब्ज डॉलर्सवर असलेल्या देशातील संरक्षणक्षेत्राशी निगडीत उद्योगाची व्याप्ती २०२५ सालापर्यंत २५ अब्ज डॉलर्सवर नेण्याचे ध्येय केंद्र सरकारने आपल्यासमोर ठेवले आहे. २०२५ सालापर्यंत देशाची संरक्षणविषयक निर्यात तब्बल पाच अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्टही सरकारसमोर आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. या आघाडीवर देशातील एरोस्पेस उद्योग फार मोठे योगदान देऊ शकतो, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला. एकाच दिवसापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी ‘इंडियन ओशन रिजन-आयओआर’ क्षेत्रातील देशांना भारत शस्त्रास्त्रे पुरविण्यास तयार असल्याची घोषणा केली होती.
देशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी काही देश उत्सुकता दाखवित असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी नुकतेच म्हटले होते. तर भारत ३०९ कोटी रुपये इतक्या किंमतीत तेजसची निर्यात करण्याच्या विचारात असल्याचे एचएएलचे अध्यक्ष आर. माधवन यांनी म्हटले आहे. आग्नेय आशियाई व आखाती देशांकडून तेजसबाबत उत्सुकता दाखविली जात असताना, एचएएलच्या प्रमुखांनी केलेले हे विधान अत्यंत महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, एरो इंडियाच्या निमित्ताने अमेरिकेची संरक्षणसाहित्याच्या निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी व एचएएलमध्ये सामंजस्य करार संपन्न झाला आहे. यामुळे नव्या संधी व सहकार्याची नवी दालने खुली होतील, असे लॉक्हीड मार्टिनच्या वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेच्या बोईंगने भारतीय नौदलाच्या पी-८आय विमानांच्या देखभालीसाठी सहकार्य करार केल्याचे उघड झाले आहे.