बीजिंग – ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात गस्तीसाठी दोन अजस्त्र विमानवाहू युद्धनौका रवाना करणार्या अमेरिकेला चीनने धमकावले आहे. ‘‘साऊथ चायना सीच्या क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका रवाना करणे शांती व स्थैर्यासाठी अनुकूल नाही. या सागरी क्षेत्रातील सार्वभौमत्त्वच्या सुरक्षेसाठी चीन आवश्यक ती कारवाई करील’, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. त्याचबरोबर साऊथ चायना सी हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून त्रयस्थ देशांनी या वादात पडू नये, असे चीनने बजावले आहे.
गेले काही महिने पर्शियन आखातात तैनात असलेली अमेरिकी नौदलातील ‘न्यूक्लिअर सुपरकॅरिअर’ असणारी ‘युएसएस निमित्झ’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी रवाना झाल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाल्या होत्या. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे इंडो-पॅसिफिकमधील सध्याचे धोरण कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर निमित्झच्या नव्या तैनातीकडे पाहिले जात होते. पण त्याआधीच निमित्झ युद्धनौका साऊथ चायना सीमधून प्रवास करीत असताना, ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’ ही आणखी एक विमानवाहू युद्धनौका देखील या क्षेत्रात दाखल झाली.
अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौकांची एकाच सागरी क्षेत्रातील गस्त ही प्रचंड बहुमूल्य संधी असल्याचे ‘रूझवेल्ट’ युद्धनौकेचे कमांडर रिअर अॅडमिरल डोग वेरिसिमो यांनी म्हटले आहे. तर या सागरी क्षेत्रात दोन विमानवाहू युद्धनौका रवाना करणार्या अमेरिकेवर चीनने टीका केली आहे. ‘अमेरिका वेळोवेळी आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने रवाना करून या क्षेत्रात सामर्थ्यप्रदर्शन करीत आला आहे. अमेरिकेची ही कारवाई या क्षेत्रातील शांती व स्थैर्यासाठी अनुकूल ठरत नाही’, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी केली.
दरम्यान, बायडेन प्रशासनाचा अंदाज घेणार्या चीनला इशारा देण्यासाठी अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात दोन विमानवाहू युद्धनौका रवाना केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.