मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंदोलन करणार्या अॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांचे समर्थक देशद्रोही व नाटोचे एजंट असल्याचा घणाघाती आरोप रशियाच्या परराष्ट्र विभागाने केला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक म्हणून ओळखण्यात येणारे अॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांना गेल्या महिन्यात तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यावरून रशियात निदर्शने सुरू असून अमेरिका व युरोपिय देशांनी नॅव्हॅल्नी यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांच्यावर प्राणघातक विषप्रयोग झाला होता. नॅव्हॅल्नी यांच्यावरील या विषप्रयोगासाठी रशियन सरकार जबाबदार असल्याचा आरोप झाला होता. गेल्या महिन्यात नॅव्हॅल्नी रशियात माघारी आल्यानंतर त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात धाडण्यात आले होते. त्याविरोधात नॅव्हॅल्नी यांच्या समर्थकांनी व्यापक आंदोलन सुरू केले असून सलग तीन आठवडे रशियाच्या विविध शहरात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांविरोधात रशियन राजवटीने आक्रमक भूमिका घेतली असून आतापर्यंत सुमारे आठ हजारांहून अधिक निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रशियाकडून निदर्शकांवर सुरू असलेल्या कारवाईवरून पाश्चात्य देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. रशियात राष्ट्राध्यक्ष पुतिन विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आरोप करण्यात आले होते. काही युरोपिय देशांनी रशियन राजनैतिक अधिकार्यांची हकालपट्टीही केली होती. तर अमेरिकेने कठोर निर्बंध लादण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. पाश्चात्य देशांकडून सुरू असलेल्या या हालचालींवर रशियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
‘नॅव्हॅल्नी यांचे समर्थक असणार्यांना विरोधक म्हणणे थांबवा. विरोधक हे नाहीत, वेगळेच आहेत. नॅव्हॅल्नी यांचे समर्थक म्हणजे दुसर्यांचा प्रभाव असणारे एजंट्स असून त्याचे पुरावेही आहेत. ८ फेब्रुवारी रोजी नॅव्हॅल्नी समर्थकांची युरोपिय महासंघासह अमेरिका व ब्रिटनच्या प्रतिनिधींबरोबर बैठक झाली. युरोप, अमेरिका आणि ब्रिटन हे सर्व नाटोचा भाग आहेत. याच बैठकीत रशियातील परिस्थिती अधिक अस्थिर करण्याचा निर्णय घेण्यात आला’, असा आरोप परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी केला. नॅव्हॅल्नी यांचे समर्थक असलेले लिओनिड वोल्कोव्ह व व्लादिमिर अशुर्कोव्ह हे दोघंही देशद्रोही असल्याचा ठपकाही झाखारोव्हा यांनी ठेवला आहे.
लिओनिड वोल्कोव्ह हा नॅव्हॅल्नी यांचा ‘चीफ ऑफ स्टाफ’ असून लिथुआनियात वास्तव्यास आहे, तर व्लादिमिर अशुर्कोव्ह ब्रिटनमधून सूत्रे हलवित असल्याचे सांगण्यात येते.