वॉशिंग्टन – दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा करण्याचे साधन म्हणून क्रिप्टोकरन्सीज्चा वाढता वापर होत असून ही एक मोठी समस्या बनली आहे, असा इशारा अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी दिला. गेल्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी कारवायांसंदर्भात महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात ‘आयएस’ व ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांकडून क्रिप्टोकरन्सीज्चा वापर होत असल्याचे सांगण्यात आले होते. उत्तर कोरियासारख्या देशाकडून अण्वस्त्र कार्यक्रमासाठी निधी पुरविण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर झाल्याचेही नुकतेच उघड झाले होते.
गेल्या काही दिवसात जगातील आघाडीची क्रिप्टोकरन्सी असणार्या ‘बिटकॉईन’चे दर सातत्याने उसळी घेत असून विक्रमी स्तरावर जाऊन पोहोचले आहेत. अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक व वित्तसंस्थांकडून क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक तसेच त्याचे व्यवहार सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सींचे दरही वाढू लागले असून त्यातील गुंतवणूक प्रचंड प्रमाणात वाढल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या दीड महिन्यात अमेरिकेच्या अर्थमंत्री येलेन यांनी तिसर्यांदा क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या धोक्याबद्दल वक्तव्य करणे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत ‘फेडरल रिझर्व्ह’च्या माजी प्रमुख असणार्या येलेन यांनी, दहशतवादी गटांकडून क्रिप्टोकरन्सीचा वाढता चिंतेची बाब असल्याचे बजावले होते. त्यानंतरही एका लेखी निवेदनात त्यांनी क्रिप्टोकरन्सीच्या धोक्याबद्दल वक्तव्य केले होते. बुधवारी अर्थक्षेत्रातील नवे तंत्रज्ञान व संशोधन यासंदर्भातील धोरणाबाबत बोलताना अर्थमंत्री येलेन यांनी क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख केला.
‘नवे तंत्रज्ञान म्हणून क्रिप्टोकरन्सी हे आश्वासक तंत्रज्ञान असल्याचे दिसते. मात्र वास्तवात त्याच्या वापर कशासाठी होत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अंमली पदार्थांचे ऑनलाईन व्यवहार करणार्यांकडून त्याचा वापर होत आहे. क्रिप्टोकरन्सी हे दहशतवादाला अर्थपुरवठा करण्याचे साधन बनले आहे’, असा इशारा अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी दिला. गेल्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार व व्याप्ती वाढत असतानाच अमेरिकी नेतृत्त्वाने त्याविरोधात भूमिका घेतली असून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच माजी अर्थमंत्री स्टिव्हन एम्नुकिन यांनीही क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत बजावले होते.
आपण ‘बिटकॉईन’ अथवा इतर कोणत्याही ‘क्रिप्टोकरन्सीज्’ चाहते नसल्याचे सांगून या क्रिप्टोकरन्सीज्द्वारे अंमली पदार्थांचा व्यापार व इतर बेकायदा कारवायांना प्रोत्साहन मिळते, अशी खरमरीत टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. तर, ‘सायबरगुन्हेगारी, करचुकवेगिरी, खंडणीखोरी, अंमली पदार्थांचा व्यापार, मानवी तस्करी यासारख्या अनेक बेकायदेशीर कारवायांमधून अब्जावधी डॉलर्सचे व्यवहार करण्यासाठी बिटकॉईन व इतर क्रिप्टोकरन्सीज्चा वापर केला जातो. क्रिप्टोकरन्सी हा आता अमेरिकेसाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे’, असा इशारा माजी अर्थमंत्री स्टिव्हन एम्नुकिन यांनी दिला होता.