भारताचे परराष्ट्र सचिव रशियात दाखल

परराष्ट्र सचिवनवी दिल्ली/मॉस्को – भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला रशियामध्ये दाखल झाले आहेत. कोरोनाची साथ असताना सुरू झालेला आपला हा रशिया दौरा उभय देशांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करीत आहे, असे श्रृंगला म्हणाले. आपल्या या दौर्‍यात परराष्ट्र सचिव श्रृंगला यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली तसेच रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह आणि इगोर मोर्गुलोव्ह यांचीही श्रृंगला भेट घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील सहकार्य अधिकच व्यापक करण्यावर भारत व रशियाचे एकमत झाल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र सचिव श्रृंगला रशियाच्या भेटीवर असतानाच, ‘फॉरिन पॉलिसी’ नावाच्या मासिकामध्ये लक्षवेधी लेख प्रसिद्ध झाला आहे. विश्‍लेषक सॅल्वेटोर बॅबोन यांनी लिहिलेल्या या लेखात बायडेन यांच्या प्रशासनाला भारत व रशियाबाबत अत्यंत महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे. भारताने रशियाकडून एस-४०० ही हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी केली आहे. या व्यवहारावर निर्बर्ंध लादण्याची धमकी बायडेन यांच्या प्रशासनाकडूनही दिली जात आहे. मात्र बायडेन प्रशासनाने तसे न करता भारताला रशियाकडून शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य खरेदी करण्याची परवानगी द्यावी, असे बॅबोन यांनी सुचविले आहे.

भारताने अमेरिकेकडून नाही, तर रशियाकडून शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्या खरेदी करण्यात अमेरिकेचे हितसंबंध गुंतलेले आहेत, याची जाणीव बॅबोन यांनी या लेखात करून दिली. अमेरिकेच्या निर्बंधांचा विचार करून भारताने रशियाकडून शस्त्रे खरेदी करण्याचे थांबविले, तर रशिया चीनच्या अधिकच जवळ जाईल. ते अमेरिकेसाठी घातक ठरू शकते. त्यापेक्षा भारताचे रशियाबरोबरील पारंपरिक संरक्षणविषयक सहकार्य कायम राहिले तर रशियाचे चीनबरोबरील सहकार्य मर्यादित राहिल व यातच अमेरिकेचे हित आहे, असा दावा या लेखात करण्यात आलेला आहे.

ही शक्यता लक्षात घेऊन ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतावर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला नव्हता. पण बायडेन प्रशासनाकडून भारताला तशी सवलत मिळेल, याची खात्री देता येत नाही. पण अमेरिकेच्या विरोधाची पर्वा न करता भारताने रशियाकडून ‘एस-४००’ खरेदी करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, बॅबोन यांनी बायडेन यांच्या प्रशासनाला दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरतो. नाटोचा सदस्यदेश असलेल्या तुर्कीने देखील रशियाकडून ‘एस-४००’ची खरेदी केलेली आहे. त्यानंतरही तुर्की नाटोचा सदस्यदेश आहे व अमेरिकेने अद्याप तुर्कीवर कारवाई केलेली नाही, याकडेही बॅबोन यांनी लक्ष वेधले.

या पार्श्‍वभूमीवर, भारत व रशियामधील सहकार्याकडे अमेरिका अत्यंत बारकाईने पाहत असल्याचे उघड झाले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या रशियाभेटीचे महत्त्व यामुळे अधिकच वाढले आहे.

श्रृंगला यांच्या या दौर्‍यात उभय देशांमध्ये सामरिक पातळीवरील सहकार्य वाढविण्याबरोबरच इतरही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा अपेक्षित आहे. रशिया भारताला लढाऊ विमाने तसेच इतर शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य पुरविण्यासाठी उत्सुकता दाखवित आहे. सध्या रशियन अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असून रशियाला या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताचे सहाय्य अपेक्षित असल्याचे सांगितले जाते. भारतही रशियाबरोबरील संबंधांकडे कधीही दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही रशियाला देत आहे. त्याचवेळी रशियाला भारत व चीनबरोबरील संबंधांमध्ये समतोल राखण्याची कसरत करावी लागणार आहे. पण तसे करीत असताना चीनकडे भारताइतकी विश्‍वासार्हता नाही, याचीही जाणीव रशियाने ठेवावी, अशी भारताची अपेक्षा आहे. अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर, बायडेन प्रशासन रशियाला लक्ष्य करणारी धोरणे स्वीकारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत रशिया भारतासारख्या विश्‍वासार्ह मित्रदेशाबरोबरील संबंध अधिकच दृढ करण्यासाठी नव्याने प्रयत्न करीत आहे.

leave a reply