मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाची नवी लाट येण्याची भीती नव्या रुग्णांची वाढती संख्या पाहता व्यक्त केली जाऊ लागली आहे. अडीच महिन्यांनी प्रथमच महाराष्ट्रात चोवीस तासात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 6 हजारांवर गेली आहे. यामध्ये मुंबईत 823 नवे रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्ध्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहेत. तसेच पुण्यातही कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत लक्षणिय वाढ दिसून आली आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सावधगिरी म्हणून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. इतर शहरातही लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारतात आठवडाभरात कोरोना पुन्हा डोके वर काढत असल्याचे समोर येत आहे. गुरुवारपासून शुक्रवार सकाळपर्यंतच्या 24 तासात 13 हजार 193 नवे रुग्ण देशभरात आढळून आले. तसेच 96 जणांचा या साथीत बळी गेला. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा देशभरात 10 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर इतर राज्यातूनही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. चोवीस तासात सुमारे तीन हजार नवे कोरोना रुग्ण आठवडाभरापूर्वी आढळत होते. ती संख्या वाढून चार हजारांवर गेली. तर गेल्या दोन दिवसांपासून पाच हजार रुग्ण आढळत होते. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 6,112 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे तज्ज्ञ आणि प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहेत.
कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यावर नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढला होता. कित्येक जणांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे सोडून दिले. यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचा दावा केला जात आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच वेळ आली तर लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा दिला जात आहे.
अमरावती आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. अमरावतीत तीन दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. तर यवतमाळ प्रशासनाने 10 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच संचाराबाबतचे इतर नियमही कडक करण्यात आले आहेत. वर्ध्यातही रात्रीचा कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. मुंबई प्रशासनानेही लग्न, समारंभासह काही कोरोना नियमात बदल केले आहेत. तसेच पाच पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांची संख्या पाहता मुंबईत अजून नियम कडक करण्यात येतील, असे संकेत मिळत आहेत. तसेच लोकल सेवा सुरू होण्याची शक्यताही लांबणीवर पडली आहे.
दरम्यान, विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथे कोणत्या नव्या स्ट्रेनचा कोरोना असावा अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र आतापर्यंत असे काही आढळले नसून ए2 टाईपचाच कोरोना असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.