इस्लामाबाद – गाळात बुडालेली आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी पाकिस्तानने चीनकडून सुमारे सहा अब्ज डॉलर्सचे नवे कर्ज घेतले आहे. मात्र या कर्जासाठी भारताचा सार्वभौम भाग असलेल्या गिलगीट-बाल्टिस्तानमधील ‘स्कार्डू’ हवाई तळ तारण ठेवण्याची तयारी पाकिस्तानने केल्याची चर्चा आहे. याला अद्याप अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही. पण जर ही बातमी खरी असेल तर ती भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारी बाब ठरते, असे दावे केले जात आहेत.
काश्मीरचाच भूभाग असलेल्या गिलगीट-बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत घोषित करण्याची तयारी पाकिस्तान करीत आहे. सीपीईसी प्रकल्पातील गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी चीनने पाकिस्तानसमोर गिलगीट-बाल्टिस्तानला आपला पाचवा प्रांत जाहीर करण्याची अट घातली होती. हा वादग्रस्त भूभाग असेल तर मग चीनने या ठिकाणी गुंतवणूक कशासाठी करायची, असा सवाल चीनने केला होता. त्यानंतर पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी चीनची मागणी पूर्ण करण्याची तयारी केली.
गिलगीट-बाल्टिस्तानच्या जनतेच्या पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाला पूर्णपणे विरोध आहे. पण चीनच्या कर्जाच्या आशेने पाकिस्तान हा आत्मघातकी निर्णय घेत आहे. यानुसार चीनने पाकिस्तानला सुमारे सहा अब्ज डॉलर्स इतके कर्ज पुरविण्याची तयारी केली आहे. पण याच्या मोबदल्यात गिलगीट-बाल्टिस्तानातील ‘स्कार्डू’ हवाई तळ पाकिस्तान चीनकडे तारण ठेवणार आहे. स्कार्डू हवाई तळावर चीनची लढाऊ विमाने तैनात असल्याच्या बातम्या याआधीच प्रसिद्ध झाल्या होत्या.
त्यामुळे ‘स्कार्डू’चा वापर करून पाकिस्तान आणि चीन भारतावर कुरघोडी करू पाहत असल्याचे दिसते. ही भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारी बाब ठरते. विशेषतः लडाखच्या एलएसीवरून भारताने चीनला माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर, यासंदर्भात चीन व पाकिस्तानने केलेल्या हालचाली लक्ष वेधून घेत आहेत.