तेहरान – इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येसाठी अमेरिकेला सहाय्य करणार्या अरब देशांनी याच्या परिणामांसाठी तयार रहावे, अशी धमकी इराणचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाघेरी यांनी दिली. तसेच सुलेमानी यांच्या हत्येच्या कटात आखातातील अमेरिकेचे सर्व अरब मित्रदेश सहभागी होते, असा आरोप बाघेरी यांनी केला.
वर्षभरापूर्वी इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर पडलेल्या मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्या मोटारीवर अमेरिकेने ड्रोन हल्ला चढविला होता. या हल्ल्यात सुलेमानी यांच्यासह इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचे वरिष्ठ नेते ठार झाले होते. सुलेमानी हे इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख होते. सुलेमानी हे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक होते, असे सांगून तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन केले होते. अमेरिकेने सुलेमानी यांची केलेली हत्या इराणसाठी मोठा धक्का होता.
सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याची धमकी इराणने दिली होती. यासाठी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढविण्याची घोषणा इराणच्या लष्करी अधिकार्यांनी केली होती. त्यानंतर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले झालेही आहेत. पण इराणचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल बाघेरी यांनी सुलेमानी यांच्यावरील हत्येसाठी अरब देशांनी अमेरिकेला सहाय्य केल्याचा आरोप केला आहे. ‘सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार आणि बाहरिनने अमेरिकेला सुलेमानी यांच्याबद्दल गोपनीय माहिती पुरविली. तर कुवैत, जॉर्डन आणि इराकमधून उड्डाण केलेल्या ड्रोन्सनी सुलेमानी यांच्या मोटारीवर हल्ला चढविला. सुलेमानी हे लष्कराच्या चिलखती वाहनात बसले होते. याची माहितीही अरब देशांनी अमेरिकेला पुरविली. म्हणून अमेरिकेने ही मोटार कापून काढणार्या क्षेपणास्त्राचा वापर केला’, असा ठपका बाघेरी यांनी ठेवला आहे. त्याचबरोबर सुलेमानी यांच्या हत्येसाठी अमेरिकेला सहाय्य करणार्या अरब देशांना यासाठी जबाबदार धरावे, असे बाघेरी म्हणाले.
दरम्यान, इराणने पहिल्यांदाच सुलेमानी यांच्या हत्येसाठी अरब देशाांवर उघड आरोप केले आहेत.