नवी दिल्ली – ‘कोरोना प्रतिबंधक लस, जागतिक हवामान बदल आणि नवे तंत्रज्ञान यावर विचार करणारी क्वाड संघटना आता परिपक्व होत असून जगाचे भले करणारी सकारात्मक शक्ती बनत आहे’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन क्वाडच्या या पहिल्याच व्हर्च्युअल बैठकीत सहभागी झाले होते. वर्चस्ववादी चीनची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लोकशाहीवादी देशांचे हे संघटन पुढाकार घेत असल्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी क्वाडच्या सदस्यदेशांनी अधिक प्रयत्न करण्याचे मान्य केले. वेगळ्या शब्दात आपल्या कोरोनाच्या लसीचा वापर करून चीनला या क्षेत्रातील गरीब देशांना आपल्या फासात अडविण्याची संधी मिळू नये, यासाठी हे प्रयत्न आवश्यक बनले होते. त्याचा थेट दाखला न देता, भारताच्या पंतप्रधानांनी, कोरोनाच्या लसीबाबत तसेच जागतिक हवामान बदल व नव्या तंत्रज्ञानावर विचार सुरू करून क्वाडने आपण परिपक्व बनल्याचे संकेत दिल्याचे म्हटले आहे. क्वाडचे सदस्यदेश लोकशाहीवादी मुल्य व स्वतंत्र, मुक्त आणि सर्वसामावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी वचनबद्ध आहेत, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. क्वाडचे हे सहकार्य भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या प्राचीन तत्त्वज्ञानाशी सुसंगत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
क्वाडचे सदस्य यापुढे आधीपेक्षा अधिक एकजुटीने काम करतील व क्वाड क्षेत्रिय स्थैर्याचा आधारस्तंभ बनेल, असा विश्वास भारताच्या पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारभार आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार चालावा अशी अपेक्षा यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केली. तसेच अमेरिका पुढच्या काळात क्वाडबरोबर अधिक सहकार्य करणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. तर जपानचे पंतप्रधान सुगा यांनी स्वतंत्र, मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जपान संपूर्ण सहकार्य करील, अशी घोषणा केली आहे. त्याचवेळी २०११ साली जपानमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या वेळी केलेल्या सहाय्यसाठी पंतप्रधान सुगा यांनी भारत, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे आभार मानले.
इंडो-पॅसिफिक क्षेत्र म्हणजे २१ व्या शतकातील जगाचे भवितव्य असल्याचा दावा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केला. क्वाडच्या लोकशाहीवादी देशांची भागीदारी या क्षेत्रातील शांती, स्थैर्य आणि समृद्धी वाढविणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मॉरिसन यांनी व्यक्त केला. यासाठी कार्य करीत असताना, इतर देशांनाही यात सामावून घेण्याचे काम क्वाड करील, अशी अपेक्षा पंतप्रधान मॉरिसन यांनी व्यक्त केली. धोरणात्मक पातळीवरील विश्वास, सामुहिक आशावाद व समान मुल्य याच्या आधारावर देश एकत्र आले तर खूप काही साध्य करता येऊ शकते, हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिलेले आहे, असे ऑस्ट्रेलियच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.