वॉशिंग्टन/तेहरान – ‘इराणबरोबरील अणुकराराबाबत अमेरिका खरोखरच गंभीर असेल, तर आधी अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घ्यावे व 2015 सालच्या अणुकराराचे पालन करावे’, असे इराणने पुन्हा एकदा बजावले आहे. आपण काहीही न करता अमेरिका अणुकरारात सहभागी होईल, असा समज इराणने करून घेतला असेल, तर ते चुकीचे आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. त्यावर इराणने ही प्रतिक्रिया नोंदविलेली आहे. अमेरिका आणि इराणकडून अणुकराराबाबत अशी टोलेबाजी सुरू असताना, इराणबरोबरच्या अणुकरारावर गंभीर चर्चा करण्यासाठी अवघ्या दहा आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे कारण त्यानंतर इराणमध्ये निवडणूक पार पडेल, असा इशारा अमेरिकेच्या माजी ऊर्जामंत्र्यांनी दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी अणुकरारासंदर्भात इराणबरोबर अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. युरोपिय व इतर मध्यस्थांच्या मार्फत इराणशी अणुकरारावर बोलणी सुरू आहेत. या मार्गाने अमेरिकेची भूमिका इराणपर्यंत पोहोचविली जात आहेत, असा दावा सुलिवन यांनी केला. ही अप्रत्यक्ष चर्चा सुरू असताना, अमेरिक व इराण एकमेकांना कडक शब्दात इशारे देऊन आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसते. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी इराणने अणुकराराबाबत गैरसमज करून घेऊ नये, असा इशारा दिला आहे.
इराणने अणुकराराचे पालन केल्याखेरीज अमेरिका इराणबरोबरील अणुकरारात सहभागी होणार नाही. हा अणुकरार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही अटींचे पालन करावे लागणार नाही, असा गैरसमज इराणने करून घेऊ नये. या अणुकराराबाबत अमेरिका एकतर्फी निर्णय घेणार नाही. त्यासाठी इराणला योग्य दिशेने प्रयत्न करावेच लागतील, असा संदेश नेड प्राईस यांनी दिला आहे. त्याला उत्तर देणारी प्रतिक्रिया इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरिफ यांनी
युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख असलेल्या जोसेफ बोरेल यांना पाठविलेल्या पत्राची माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. या पत्रात अणुकराराबाबत अमेरिकेकडून असलेल्या अपेक्षा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अणुकरारातून माघार घेऊन त्याचे उल्लंघन केले होते. अमेरिका अणुकराराबाबत गंभीर असेल, तर आधी ही चूक निस्तारून अमेरिकेने अणुकराराचे पालन करण्यासाठी पहिले पाऊल उचलावे, अशी मागणी या पत्राद्वारे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. 2015 साली झालेल्या अणुकरारात इराणवरील निर्बंध मागे घेण्याचे मान्य करण्यात आले होते. त्याचा दाखला इराणकडून दिला जात आहे. निर्बंध मागे घेतल्याखेरीज अणुकरार शक्य नसल्याची इराणची भूमिका आहे. तर इराण मर्यादेच्या बाहेर जाऊन युरेनियमचे संवर्धन करून अणुकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला जात आहे. आधी इराणने हे उल्लंघन थांबवावे, अशी मागणी अमेरिकेकडून केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी अणुकराराबाबत अमेरिका व इराण उघडपणे तडजोड करण्यास तयार नसल्याचे दिसते.
मात्र दोन्ही देश असे दावे करीत असले, तरी अणुकरारावर दोन्ही देशांमध्ये अप्रत्यक्ष पातळीवर बोलणी सुरू असल्याचे सांगून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी याला निराळेच वळण दिले आहे. या वाटाघाटींच्या यशापयशावर इराणच्या अणुकराराचे भवितव्य ठरेल, असे संकेत मिळत आहेत. तर 2015 सालच्या या अणुकरारासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे अमेरिकेचे माजी ऊर्जामंत्री अर्नेस्ट मोनिझ यांनी सदर अणुकरारावर गंभीर चर्चा करण्यासाठी अवघ्या दहा आठवड्यांचा कालावधी शिल्लक असल्याचा दावा केला.
दहा आठवड्यानंतर इराणमध्ये निवडणूक पार पडेल. त्याच्या आधी अणुकरारावर सहमती झाली नाही, तर इराणमध्ये नवे सरकार आल्यानंतर नव्याने चर्चा सुरू करावी लागेल, असा दावा मोनिझ यांनी केला आहे.