- एनआयए, दिल्ली व मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
- तिहार जेलमध्ये ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्याची चौकशी
नवी दिल्ली – मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ इमारतीबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात शनिवारी दिल्ली पोलीस पुन्हा एकदा तिहार कारागृहात पोहोचलेे. दिल्ली पोलिसांनी तेहसिन अख्तर नावाच्या ‘इंडियन मुजाहिद्दीन’ दहशतवाद्याची कसून चौकशी केल्याचे वृत्त आहे. ‘अँटिलिया’ स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेण्यासाठी ज्या सोशल मीडिया चॅनलचा वापर करण्यात आला, ते अकाऊंट अख्तर जवळ सापडलेल्या मोबाईलमधूनच ऑपरेट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली असली, तरी इंडियन मुजाहिद्दीन पुन्हा एकदा ‘जैश-उल-हिंद’ नावाने सक्रीय होण्याच्या प्रयत्नात असल्याचा अहवाल येत आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), मुंबई एटीएस आणि दिल्ली पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी व्यापक ऑपरेशन हाती घेतल्याच्या बातम्या येत आहे.
गेल्या महिन्यात मुंबईत मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर पार्क केलेली संशयीत कार आणि त्यामध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणातील गुंता दरदिवशी वाढत चालला आहे. या प्रकरणात दरदिवशी नवे खुलासे होत आहे. त्यातच आता ‘जैश उल-हिंद’ हा ‘इंडियन मुजाहिद्दीन’चाच नवा चेहरा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पुढे आलेल्या अहवालानंतर एनआयए, दिल्ली व मुंबई पोलिसांकडून याचा उलगडा करण्यासाठी ऑपरेशन हाती घेतल्याचे वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक तिहार तुरुगांत तेहसिन अख्तर या ‘इंडियन मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचले. ‘अँटिलिया’ बाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी एका सोशल मीडिया चॅनलद्वारे ‘जैश उल-हिंद’ने स्विकारली होती. मात्र तपासात हा सोशल मीडिया अकाऊंट तिहार कारागृहाच्या परिसरातील मोबाईलमधून तयार झाल्याचे लक्षात आले होते. दोन दिवसांपूर्वी तिहार कारागृहात छापा टाकून हा संशयीत मोबाईल बॅरेक क्रमांक 8 मधून जप्त करण्यात आला. याच बॅरेकमध्ये ‘इंडियन मुजाहिद्दीन’ तेहसिन अख्तरला ठेवण्यात आले आहे. हा मोबाईल त्याच्या जवळ कसा पोहोचला याच्या चौकशीबरोबर ‘इंडियन मुजाहिद्दीन’ आणि ‘जैश-उल-हिंद’ संबंधांचाही शोध घेतला जात आहे.
2014 साली तेहसिन अख्तरला अटक करण्यात आली होतीे. न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन अख्तरची चौकशी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. दरम्यान, याच प्रकरणात शनिवारी मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एनआयएने चौकशी केली. शुक्रवारी मुंबई एटीएसकडून वाझे यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालकाचा संशयित मृत्यु झाला होता. यामध्ये वाझे यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे.