भारत-चीनमध्ये अविश्‍वास वाढत असताना भारताचे अमेरिकेबरोबरील सहकार्य अधिकाधिक उंची गाठत आहे

- अमेरिकेचे ऍडमिरल ऍक्विलिनो यांचा दावा

वॉशिंग्टन – ‘भारत आणि अमेरिकेमधील लष्करी सहकार्य पूर्वी कधीही नव्हते इतक्या उंचीवर पोहोचले आहे. त्याचवेळी भारत आणि चीनमधील अविश्‍वास याआधी गेला नव्हता, इतका खालच्या स्तराला गेलेला आहे’, असे सूचक उद्गार अमेरिकेचे ऍडमिरल जॉन ऍक्विलिनो यांनी काढले. लवकरच अमेरिकेन नौदलाच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’ची सूत्रे ऍडमिरल ऍक्विलिनो हाती घेतील. त्याआधी अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोरील सुनावणीत ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी केलेले हे दावे लक्षवेधी ठरतात.

आपल्या उत्तरेकडील सीमेच्या संरक्षणासाठी भारताने कणखर भूमिका स्वीकारली आणि चीनला जबरदस्त प्रत्युत्तर दिले, असे सांगून यासाठी ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी भारताची प्रशंसा केली. लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती खूपच बदललेली आहे. यानंतर भारत चीनकडे अविश्‍वासाने पाहू लागला असून चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पावर भारत अधिकच संशय घेऊ लागला आहे. तर पाकिस्तानचे ग्वादर व श्रीलंकेच्या हंबंटोटा बंदरामधील चीनच्या कारवाया भारताच्या चिंतेत भर घालणार्‍या ठरत आहेत, असे ऍडमिरल ऍक्विलिनो म्हणाले.

याच्या बरोबरीने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या कारवाया, अपारदर्शक धोरणे आणि हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या दुटप्पी हालचाली, यामुळे सदर क्षेत्रातील स्थैर्य धोक्यात आले आहे, असा निष्कर्ष ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी अमेरिकेच्या सिनेटला दिलेल्या लेखी जबाबात म्हटले आहे. भारत व चीनमधील अविश्‍वास वाढत चाललेला आहे. अशा काळात भारताचे अमेरिकेबरोबरील लष्करी सहकार्य आधी नव्हते, इतक्या उंचीवर पोहोचलेले आहे, असा दावा ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी केला. भारताबरोबरील द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय सहकार्य अधिकाधिक दृढ बनत चालल्याचा अनुभव अमेरिका घेत आहे, अशी माहिती यावेळी ऍक्विलिनो यांनी दिली.

लडाखमधील चीनच्या कारवायांमुळे केवळ भारतच नाही तर इतर शेजारी देशांना चीनपासून असलेला धोका नव्याने अधोरेखित झाल्याचे ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी स्पष्ट केले. यामुळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भारत व अमेरिकेमधील लष्करी सहकार्य वाढले आहे आणि ही सकारात्मक बाब ठरते. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्र मुक्त आणि स्वतंत्र ठेवण्यासाठी भारत व अमेरिका अधिक खुलेपणाने परस्परांना सहकार्य करतील, असा विश्‍वास ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी व्यक्त केला. इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख म्हणून आपली नियुक्ती झालीच, तर आपण भारताबरोबरील अमेरिकेचे हे सहकार्य अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी केली. त्याचवेळी भारताच्या संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणासाठी आपण सहाय्य करण्याला प्राधान्य देऊ, असे ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महत्वाच्या पदावर नियुक्ती होण्याच्या आधी अमेरिकेच्या ऍडमिरल तसेच कमांडर्सना त्या पदाबाबतची आपली भूमिका व विचार अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’समोर मांडावे लागतात. ही सुनावणी अत्यंत गंभीरपणे घेतली जाते. ऍडमिरल ऍक्विलिनो यांनी यासंदर्भात मांडलेली भूमिका म्हणूनच लक्ष वेधून घेणारी आहे.

leave a reply