आठवड्याभरानंतर सुएझ कालव्याची कोंडी फुटली

- ‘एव्हर गिव्हन’ जहाज पुढे सरकले

कैरो – गेल्या सात दिवसांपासून सुएझ कालव्यातील जगभरातील मालवाहतुकीची झालेली कोंडी सोमवारी फुटली. चीनमधून युरोपसाठी जाणारे ‘एमव्ही एव्हर गिव्हन’ जहाज मार्गस्थ करण्यात यंत्रणांना यश मिळाले आहे. याबरोबर सुएझच्या कालव्यातील मालवाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. पण आठवड्याभराच्या कोंडीमुळे निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो, असा दावा या क्षेत्रातील कंपन्या करीत आहेत. त्याचबरोबर सुएझ कालव्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यावरही विचार सुरू झाला आहे.

गेल्या आठवड्यात भूमध्य समुद्राच्या दिशेने प्रवास करणारे ‘एव्हर गिव्हन’ कंटेनर जहाज धूराच्या वादळामुळे सुएझ कालव्याच्या मधोमध रूतले होते. दोन लाख २० हजार टनहून अधिक वजनाच्या या जहाजाची लांबी ४०० मीटर इतकी आहे. २० हजार कंटेनर्स वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या जहाजाने केलेल्या कोंडीमुळे सोमवारपर्यंत सुमारे चारशे जहाजांची वाहतूक रखडली होती. यामुळे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच ही कोंडी फोडण्यात काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असा इशारा यामध्ये गुंतलेल्या एका कंपनीने दिला होता.

पाच दिवसांच्या प्रयत्नानंतरही सदर जहाज तसेच अडकून पडल्यामुळे इतर कंपन्यांनी आपल्या मालवाहू जहाजांचा मार्ग बदलण्याचा इशारा दिला होता. तसेच सुएझ कालव्याला पर्याय शोधण्याचे संकेत दिले होते. आशिया व युरोपमधील या व्यापारी जहाजांसाठी रशियाने नॉर्थ सीमार्गे आर्क्टिकचा पर्याय सुचविला होता. तर इराणने देखील भारत विकसित करीत असलेल्या छाबहार बंदरातून अझरबैजानमार्गे रशियाला जोडणारा ७२०० किलोमीटरचा मार्ग सुचविला होता. ही कोंडी फोडण्यासाठी अमेरिका तसेच चीनने आपले नौदल तसेच विशेष पथक रवाना करण्याची घोषणा केली होती.

इजिप्तच्या यंत्रणांनी देखील ड्रेजर लावून एव्हर गिव्हनचा मागील व पुढील भाग गाळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सोमवारी सकाळी सदर कंटेनर जहाज गाळातून काढून पाण्यावर आणण्यात यश मिळाले. पुढे टग बोटींच्या सहाय्याने या मालवाहू जहाजाची दिशा बदलून किनार्‍याच्या समांतर आणण्यासाठी दुपारपर्यंतचा वेळ गेला. पुढे संध्याकाळच्या सुमारास एव्हर गिव्हन जहाज भूमध्य समुद्राच्या दिशेने रवाना झाले असून सॅटेलाईट ट्रॅकरने या जहाजाच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यात येत आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत सुएझ कालव्यातील मालवाहू जहाजांचा प्रवास संथ गतीने सुरू करण्यात आली होती. सुएझ कालव्याच्या दोन्ही टोकांवर शेकडो जहाजे रखडलेली आहेत. सुएझ कालव्याची कोंडी फुटली असली तरी येथील जहाजांचे ट्रॅफिक जॅम सोडविण्यासाठी पुढील काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. तसेच या कोंडीमुळे निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी देखील आठवड्यांचा अवधी लागेल, असे दावे केले जात आहेत.

दरम्यान, येत्या काळात सुएझ कालव्याला पर्यायी मार्ग शोधण्याची फार मोठी गरज असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय कंपन्या करीत आहेत. दररोज ३० लाख टन मालवाहतूक होणार्‍या या सागरी मार्गाची येत्या काळात पुन्हा कोंडी झाली तर त्याचा फार मोठा विपरित परिणाम इंधनाच्या वाहतूकीवरही होईल, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply