भारत व दक्षिण कोरिया संरक्षणसाहित्याची संयुक्त निर्मिती करणार

नवी दिल्ली – भारत व दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये संयुक्तरित्या संरक्षणसाहित्याची निर्मिती तसेच त्याच्या निर्यातीवर एकमत झाले आहे. यावेळी दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांनी भारतात उभारण्यात येणार्‍या दोन ‘डिफेन्स कॉरिडॉर’मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दर्शविल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्याचवेळी दोन्ही देशांनी सायबर, अंतराळ क्षेत्र व ‘इंटेलिजन्स शेअरिंग’मधील सहकार्य वाढविण्याची तयारीही केल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांचा तीन दिवसांचा भारत दौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍यात त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह संरक्षणदलातील प्रमुख अधिकारी, संरक्षण कंपन्या तसेच उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत, भारत व दक्षिण कोरियामधील संरक्षणविषयक सहकार्य अधिक व्यापक करणार्‍या महत्त्वाच्या गोष्टींवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१५ साली भारत आणि दक्षिण कोरियामध्ये विशेष धोरणात्मक भागीदारीबाबतचा करार संपन्न झाला होता. त्यानंतर शस्त्रास्त्रे तसेच संरक्षणसाहित्याच्या संयुक्त निर्मिती प्रकल्पांवर भारत आणि दक्षिण कोरियामध्ये चर्चा सुरू होती.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी यावर एकमत दर्शविले आहे. त्यानुसार भारत व दक्षिण कोरिया संयुक्तरित्या संरक्षणसाहित्याची निर्मिती करणार आहेत. या संरक्षणसाहित्याच्या निर्यातीचा मुद्दाही एकत्रितरित्या हाताळण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांनी भारतात उभारण्यात येणार्‍या डिफेन्स कॉरिडॉर्सबाबत विशेष उत्सुकता दर्शविली. भारत सरकार उत्तर प्रदेश व तमिळनाडू अशा दोन राज्यांमध्ये डिफेन्स कॉरिडॉर्सची उभारणी करीत असून स्वदेशी बनावटीची शस्त्रे तसेच संरक्षणसाहित्याच्या निर्मितीला गती देणे, हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे मानले जाते.

जगातील प्रगत लष्करी तंत्रज्ञान असणार्‍या देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश होतो. त्यामुळे दक्षिण कोरियाने डिफेन्स कॉरिडॉर्समध्ये दाखविलेले स्वारस्य भारतीय संरक्षणउद्योगासाठी महत्त्वाची बाब ठरते. यापूर्वी दक्षिण कोरियाने भारताला ‘के९ वज्र’ ही हॉवित्झर तोफ तयार करण्याचे तंत्रज्ञान पुरविले होते. त्याचा वापर करून भारताच्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने १०० ‘के९ वज्र’ तोफा तयार केल्या होत्या. त्यानंतर भारताने दक्षिण कोरियाकडून ‘माईन स्वीपर’ जहाज भाडेतत्त्वावर घेण्यासाठीही उत्सुकता दर्शविली आहे. संरक्षणसाहित्याच्या निर्मितीक्षेत्रात असलेली दक्षिण कोरियन कंपनी भारताला विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्यास उत्सुक असल्याचे वृत्तही काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.

भारत व दक्षिण कोरियामधील वाढत्या संरक्षणसहकार्याला चीनच्या कारवायांची पार्श्‍वभूमी असल्याचे सांगण्यात येते. चीनकडून भारतीय सीमांनजिक वाढत्या हालचाली सुरू आहेत. या हालचाली रोखण्यासाठी भारताला प्रगत तंत्रज्ञान व मोठ्या प्रमाणात संरक्षणसाहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा वेळी दक्षिण कोरियासारख्या संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या देशाबरोबरील वाढते सहकार्य निर्णायक भूमिका बजावू शकते.

leave a reply