पर्ल हार्बर – उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून या क्षेत्राला गंभीर धोका असल्याचे अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानने अधोरेखित केले. या धोक्याचा सामना करण्यासाठी तीनही देशांमधील लष्करी सहकार्य वाढविण्याचे जाहीर केले आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या संरक्षणदलप्रमुखांमध्ये झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली.
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात या क्षेत्रातील सुरक्षाविषयक हालचालींना महत्त्व देण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर, पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवर अमेरिका, जपान, दक्षिण कोरियाच्या संरक्षणदलप्रमुखांची बैठक पार पडली. यामध्ये अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले, दक्षिण कोरियाचे जनरल वोन ईन-चूल तर जपानचे ‘जनरल कोजी यामाझाकी हे उपस्थित होते. या तीनही संरक्षणदलप्रमुखांमध्ये उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत चर्चा पार पडली.
कोरियन क्षेत्रातील ांती आणि सुरक्षेसाठी तीनही देशांमधील लष्करी सहकार्य महत्त्वाचे असल्याचे दक्षिण कोरियन संरक्षणदलप्रमुखांनी म्हटले आहे. तर दक्षिण कोरिया आणि जपान या आपल्या सहकारी देशांच्या सुरक्षेबाबत अमेरिका प्रतिबद्ध असल्याचे जनरल मिले म्हणाले. यासाठी अमेरिका आपल्या सहकारी देशांना विस्तारीत लष्करी सहकार्य पुरविण्यासाठी तयार असल्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी केली.
यावेळी तीनही देशांच्या लष्करी अधिकार्यांमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेवरही चर्चा झाली. अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे मावळते प्रमुख ऍडमिरल फिल डेव्हिडसन तसेच नवनियुक्त प्रमुख ऍडमिरल जॉन ऍक्विनो देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे येत्या काळात इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचा इशारा ऍडमिरल डेव्हिडसन यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. चीनच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेने आपल्या सामर्थ्यात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन ऍडमिरल डेव्हिडसन यांनी केले होते.