बायडेन यांच्यामुळे अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल

- उत्तर कोरियाची अमेरिकेला धमकी

सेऊल – ‘उत्तर कोरियापासून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे व म्हणून अमेरिकेचे सुरक्षाविषयक धोरण उत्तर कोरियाच्या विरोधात असेल, अशी घोषणा करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सर्वात मोठी चूक केली आहे. यासाठी येत्या काळात अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी उत्तर कोरियाच्या हुकूमशाही राजवटीने दिली. अमेरिकेला कसे उत्तर दिले जाईल, हे उत्तर कोरियन राजवटीने स्पष्ट केलेले नाही. पण लवकरच उत्तर कोरिया अणुचाचणी घेऊन अमेरिकेला आव्हान देईल, असा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने केला.

गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकन कॉंग्रेसमधील आपल्या पहिल्या भाषणात बोलताना उत्तर कोरिया आणि इराणच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख केला होता. इराणबाबत अधिक शब्द खर्च न करता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम किती धोकादायक आहे, अशी माहिती दिली होती. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमापासून अमरिका तसेच जागतिक सुरक्षेला धोका असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला होता. उत्तर कोरियाच्या या धोक्याविरोधात या क्षेत्रातील मित्रदेशांबरोबर राजनैतिक तसेच लष्करी स्तरावर सहकार्य वाढविणार असल्याचे बायडेन यांनी जाहीर केले होते.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेवर रविवारी उत्तर कोरियाकडून प्रतिक्रिया आली. ‘यापुढे उत्तर कोरियाच्या विरोधात शत्रूत्वाचे धोरण स्वीकारले जाईल, हे बायडेन यांच्या घोषणेतून स्पष्टपणे प्रतिबिंबित होत आहे. गेली पाच दशके अमेरिकेचे हेच धोरण होते’, अशी टीका उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी ‘क्वोन जॉंग गून’ यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत, बायडेन प्रशासनाने ही सर्वात मोठी चूक केली, इतके निश्‍चित आहे. अमेरिकेचे उत्तर कोरियाबाबतचे हे धोरण सुस्पष्ट झाल्यामुळे आमच्यासमोर देखील यापुढील कारवाईशिवाय पर्याय उरलेला नाही. लवकरच अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकी क्वोन यांनी दिली.

२०१६-१७ या कालावधीत अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची भेट घेऊन अणुकार्यक्रमावर वाटाघाटी केल्या होत्या. यानंतर उत्तर कोरियाच्या आण्विक व क्षेपणास्त्र चाचण्या मर्यादित झाल्या होत्या. यामुळे कोरियन क्षेत्रातील तणाव काही प्रमाणात कमी झाला होता. पण बायडेन यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर, उत्तर कोरियाविरोधी सूर लावले आहेत. तर दोन महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाने देखील आपल्या अण्वस्त्रांची क्षमता वाढविण्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियन राजवटीने त्यादिशेने हालचाली सुरू केल्याचा दावा केला जातो.

अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल स्कॉट बेरियर यांनी देखील उत्तर कोरिया नव्या अणुचाचणीच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे. ही अणुचाचणी बायडेन प्रशासन व मित्रदेशांना धमकावण्यासाठी असेल, असे लेफ्टनंट जनरल बेरियर यांचे म्हणणे आहे.

leave a reply