पाच विधानसभांचे निवडणूक निकाल जाहीर

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. याबरोबरच चार लोकसभा आणि १३ विधानसभांच्या पोटनिवडणुकीच्या निकालांचीही घोषणा झाली. कोरोनाची साथ असताना झालेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते.

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) निर्णयाक विजय मिळविला असून २९२ मतदार संघांपैकी २११ जागांवर टीएमसीने विजय व आघाडी मिळविली. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) ८० जागांवर विजय मिळवून पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.

आसाममध्ये १२६ विधानसभा मतदारासंघापैकी ७९ जागांवर भाजपला विजय व आघाडी मिळाली आहे. तर कॉंग्रेस व मित्रपक्षांना एकूण ४८ जागा मिळाल्या आहेत. तर तमिळनाडूनमधील २३४ विधानसभा मतदारसंघांपैकी १५६ जागा डीएमके व आघाडीने जिंकल्या असून एआयएडीएमके आणि मित्रपक्षांनी मिळून ७८ जागांवर विजय मिळविला आहे.

केरळमध्ये १४० विधानसभा मतदार संघांपैकी ९९ जागांवर एलडीएफ आघाडीला विजय मिळाला. तर युडीएफने ४१ जागा जिंकल्या आहेत. पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित आघाडीला १५ जागांवर विजय व आघाडी मिळाली असून कॉंग्रेस व आघाडीने ९ जागा जिंकल्याचे सांगितले जाते.

रात्री उशीरापर्यंत निवडणूक आयोगाने अधिकृत पातळीवर या निकालांची घोषणा केलेली नाही. पण बर्‍याच ठिकाणी मतदारांचा कौल स्पष्ट झालेला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे माध्यमांकडून मिळत असलेल्या या आकडेवारीत फार मोठा बदल संभवत नाही.

दरम्यान, महाराष्ट्राच्या पंढरपूर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय अवताडे जिंकले आहेत. तर कर्नाटकच्या तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे दोन तर कॉंग्रेस पक्षाचा एक उमेदवार निवडून आला. गुजरातमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे तर झारखंडमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तराखंड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी झाले.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या तीन जागांवर पोटनिवडणूक झाली होती. यापैकी दोन जागांवर कॉंग्रेस व एका जागी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

कर्नाटक राज्यात लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. केरळमध्ये लोकसभेच्या एका जागेवर पोटनिवडणूक झाली होती. यात इंडियन मुस्लिम लीगचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच तमिळनाडूच्या कन्याकुमारी येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार विजयी ठरल्या आहेत.

आंध्र प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे.

leave a reply